नवी दिल्ली : बिहारमध्ये भाजप आणि ‘जदयू’ला समान १२ जागा मिळाल्या असल्या तरी केंद्रात पुढील एनडीए सरकारच्या स्थापनेत बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांची महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहे. बहुमताचा आकडा गाठण्यात भाजपला अपयश आल्याने जदयू वाटाघाटीत महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे.
२०१९ मध्ये याच नितीशकुमार यांनी केंद्रातील एनडीए सरकारमध्ये मंत्रिपदाची भाजपची ऑफर नाकारली होती. पुढील वर्षी २०२५ मध्ये विधानसभा निवडणुका होणार असल्याने जदयू राष्ट्रीय राजकारणात आपला दबदबा निर्माण करण्याची ही संधी सोडणार नाही. केंद्रात एनडीए स्थापन करणार असलेल्या नवीन सरकारमध्ये पक्ष महत्त्वाची मंत्रालये मिळवू शकतो.
प्रचारादरम्यान मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी सांगितलेले आहे की, भविष्यात आपण ‘एनडीए’सोबतच राहणार आहोत. नितीशकुमार हे पंतप्रधान नरेंद्र मोदींशी थेट संवाद साधणाऱ्या मोजक्या नेत्यांपैकी एक आहेत. त्यामुळे नवीन सरकारमध्ये त्यांच्या पक्षाचे तसेच राज्याचे राजकीय हित जपणे त्यांना सोपे जाईल, असे भाजपमधील सूत्रांनी सांगितले.
राज्यातील त्यांचे मित्रपक्ष बदलण्याच्या वारंवार घेतलेल्या निर्णयांमुळे नितीशकुमार यांच्या राजकीय विश्वासार्हतेवर निवडणुकीचे निकाल जाहीर होण्यापूर्वी प्रश्न उपस्थित केले गेले. याशिवाय त्यांच्या प्रकृतीवरूनही त्यांना राजकारणात लक्ष्य करण्यात आले होते.बिहारला विशेष दर्जा देण्याची मागणी नितीशकुमार केंद्र सरकारकडे दीर्घकाळापासून करत आहेत. मात्र, केंद्रात गेल्या एक दशकाच्या सत्तेत भाजपला ही मागणी पूर्ण करता आली नाही. एनडीएचा शक्तिशाली मित्रपक्ष म्हणून त्यांच्या जुन्या मागणीवर ते काय भूमिका घेतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
दोन कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रिपद मागणार?‘जदयू’मधील सूत्रांनी सांगितले की, मुख्यमंत्री नितीशकुमार हे किमान दोन कॅबिनेट आणि एका राज्यमंत्रिपदाची मागणी करू शकतात. नितीशकुमार यांच्या एनडीएमध्ये परतण्याच्या निर्णयाचे चांगले परिणाम दिसून आले आहेत. राज्यात एनडीएचा मित्रपक्ष म्हणून लढलेल्या सर्व १६ जागांवर पक्षाची चांगली कामगिरी झाली आहे. सर्वात मागास जातीच्या मतदारांमध्ये नितीशकुमार यांची लोकप्रियता दिसून आली आहे.
जदयू म्हणतो, आमच्यामुळे भाजपला फायदा जदयूचे मागास समुदायातील तीन तर भाजपचे मागास समुदायातील दोन उमेदवार विजयी झाले आहेत. एनडीएमध्ये नितीशकुमार हे अजूनही राज्यातील सर्वात प्रमुख ओबीसी चेहरा आहेत. नितीशकुमार हे एनडीएमध्ये परतल्याने एनडीएला राजकीयदृष्ट्या फायदाच झाल्याचे सिद्ध झाले आहे. जर नितीशकुमार राजद, काँग्रेस आणि डाव्या पक्षांच्या महाआघाडीसोबत राहिले असते तर बिहारमध्ये भाजपला यश मिळविता आले नसते. भाजपने हे वास्तव स्वीकारावे, असे मत ‘जदयू’च्या सूत्रांनी व्यक्त केले.