ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 3 - निकृष्ट दर्जाचं जेवण मिळत असल्याची तक्रार करणारा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चर्चेत आलेले बीएसएफ कॉन्स्टेबल तेज बहादूर यादव यांचा नवा व्हिडीओ समोर आला आहे. यावेळी तेज बहादूर यांनी 'आपण सत्य समोर आणल्याने छळ केला जात असल्याचा आरोप केला असून आपण न्यायास पात्र नाही का ?' असा सवाल पंतप्रधानन नरेंद्र मोदींना केला आहे.
'पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भ्रष्टाचाराशी लढा देण्याचं आवाहन केलं असल्याने माझ्या खात्यातील भ्रष्टाचार मी उघडकीस आणला. मग माझा छळ केला जात आहे ? हा सवाल सर्वांनी माझ्यावतीने पंतप्रधान नरेंद्र मोदींना विचारावा', असं आवाहन तेज बहादूर यादव यांनी व्हिडीओच्या माध्यमातून लोकांना केलं आहे. तेज बहादूर यादव यांच्या कुटुंबाने हा व्हिडीओ शूट करुन अपलोड केल्याचं कळत आहे.
'माझ्याबाबतीत पसरवल्या जात असलेल्या अफवावंर विश्वास ठेवू नका', असंही तेज बहादूर यादव यांनी यावेळी सांगितलं. पाकिस्तानकडून तेज बहादूर यादव यांचा वापर केला जात असल्याचं बोललं जात होतं. तेज बहादूर यादव यांच्या फेसबूवर अकाऊंटमध्ये मोठ्या प्रमाणत पाकिस्तानी मित्र असल्याचंही समोर आलं होतं. हाच मुद्दा अनेकांनी उचलून धरत त्यांच्यावर टीका केली होती. तेज बहादूर यादव यांच्या पहिल्या व्हिडीओला 9.9 दशलक्ष लोकांनी पाहिलं होतं तर 4.4 लाख लोकांनी शेअर केला होता.
तेज बहादूर यादव यांचा फोन बीएसएफकडून पुरावा म्हणून जप्त करण्यात आल्यानंतर, आणि बदली केल्यानंतर पत्नी शर्मिला देवी यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाच्या आदेशानंतर त्यांना भेटण्याची परवानगी देण्यात आली होती. या नव्या व्हिडीओत आपल्या तक्रार आणि आरोपांचा अधिका-यांनी व्यवस्थित तपास केला नसल्याचंही तेज बहादूर यादव बोलले आहेत.