नवी दिल्ली: राज्यसभेचे खासदार अमर सिंह यांनी एक व्हिडीओ प्रसिद्ध करत माजी अर्थमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अंबानी मोदींचे घनिष्ट मित्र असल्याचं काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणतात. मात्र अंबानी यांचे घनिष्ट मित्र मोदी नसून पी. चिदंबरम आहेत. चिदंबरम अर्थमंत्रिपदी असतानाच अंबानी यांना कोट्यवधी रुपयांची कर्जे मिळाली. ती आता बुडित खात्यात गेली आहेत. याचे सर्व पुरावे आपल्याकडे आहेत, असा दावा सिंह यांनी केला. सिंह यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांनी रुग्णालयातूनच व्हिडीओच्या माध्यमातून चिदंबरम यांच्यावर अतिशय गंभीर आरोप केले आहेत. पंतप्रधान मोदी हे अंबानींचे मित्र आहेत, असा आरोप वारंवार काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींनी केला आहे. त्यावर भाष्य करताना अमर सिंह यांनी चिदंबरम अर्थमंत्री असताना काही उद्योगपतींना बेसुमार कर्जे वाटण्यात आल्याचं म्हटलं. 'राहुलजी, मी विनंती करून तुमच्याशी बोलत आहे. कदाचित याची तुम्हाला कल्पना नसेल. व्हिडीओकॉनचे वेणुगोपाल धूत, रिलायन्सचे अनिल अंबानी यांना तुम्ही मोदींचे मित्र म्हणता. मात्र हे उद्योगपती तुमचे अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचे घनिष्ठ मित्र आहेत. याचे ठोस पुरावे माझ्याकडे आहेत. तुम्ही ज्या दिवशी सांगाल, तेव्हा हे पुरावे समोर आणू शकतो,' असं सिंग यांनी व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.
VIDEO: चिदंबरम यांनी बेसुमार कर्ज वाटप केल्यानंच अर्थव्यवस्था संकटात; अमर सिंह यांचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2020 11:59 PM