नवी दिल्ली - केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या दोन महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांकडून आंदोलन सुरू आहे. दरम्यान, या आंदोलक शेतकऱ्यांनी आज ट्रॅक्टर रॅली काढण्याचे नियोजन केले होते. मात्र आज सकाळपासूनच या रॅलीला हिंसक वळण लागले. पोलिसांनी आखून दिलेले मार्ग धुडकावत आंदोलक दिल्लीत घुसले. आंदोलक शेतकऱ्यांनी राजधानी दिल्लीत प्रवेश करत लाल किल्ल्यावर कब्जा केला आहे. तसेच या ठिकाणी शेतकऱ्यांनी आपला झेंडा फडकवला आहे. याच दरम्यान पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी शेतकऱ्यांना दिल्लीच्या सीमांवर परतण्याचं आवाहन केलं आहे.
अमरिंदर सिंग यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "दिल्लीत आज जे घडलं ते धक्कादायक दृश्य होतं. ट्रॅक्टर रॅली दरम्यान समाजकंटकांनी केलेली हिंसा कधीही स्वीकारली जाणार नाही. शांततेच्या मार्गानं सुरू असलेल्या आंदोलनाला आजच्या घटनेने छेद गेला आहे. शेतकरी नेते आणि शेतकरी संघटनांनी हिंसक घटनेपासून दूर ठेवलं आहे. ट्रॅक्टर रॅली स्थगित करण्यात आली आहे. सर्व खऱ्या शेतकऱ्यांनी दिल्लीमधून परत सीमांवर यावं" अमरिंदर सिंग यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
शेतकरी आंदोलन चिघळले! आयकर कार्यालयाजवळ एका आंदोलकाचा मृत्यू, संतापाचे वातावरण
दिल्लीच्या काही भागातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती पाहता दिल्ली-एनसीआरच्या काही भागात इंटरनेट सेवा ठप्प करण्यात आली आहे. अनेक ठिकाणी या आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. या आंदोलनादरम्यान दिल्लीतील आयकर कार्यालयाजवळ (ITO) एका आंदोलकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. नवनीत सिंह असं मृत्यू झालेल्या आंदोलकाचं नाव आहे. नवनीत हे उत्तराखंडच्या रुद्रपूर येथील बाजपूर गावाचे रहिवासी आहेत. ट्रॅक्टरसोबत स्टंट करत असताना आंदोलकाचा मृत्यू झाल्याचं म्हटलं जात आहे. मात्र गोळी लागल्याने या आंदोलकाचा मृत्यू झाल्याचा दावा उपस्थित प्रत्यक्षदर्शींकडून करण्यात येत आहे.
शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. दिल्लीत कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. सरकारचे हे अपयश आहे असं म्हणत संजय राऊत यांनी हल्लाबोल केला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबत ट्विट केलं आहे. "दिल्लीत कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. सरकारचे हे अपयश आहे. या अराजकासाठी दिल्लीत ठरवून पायघड्या घातल्या गेल्या. कोणाचा राजीनामा मागणार? सोनिया गांधी. ममता बॅनर्जी. उद्धव ठाकरे. शरद पवार की ज्यो बायडनचा? इस बात पर त्यागपत्र... राजीनामा तो बनता है साहेब... जय हिंद" असं राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.