नवी दिल्ली/चंदीगड : अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा दिलेला राजीनामा मागे न घेतल्याने नवा अध्यक्ष नेमावा का, अशी चर्चा काँग्रेसमध्ये सुरू असतानाच पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी बुधवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याने काँग्रेस नेते हबकून गेले आहेत. ते भाजपला मदतच करतील, अशी भीती काँग्रेस नेत्यांना वाटत आहे.
कॅप्टन व शाह यांच्यात पाऊण तास चर्चा झाली. कॅप्टननी त्याबाबत काहीही भाष्य करण्यास नकार दिला. ते भाजपमध्ये जाणार, की काँग्रेसमध्ये राहूनच भाजपला मदत करणार, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. सरकार नवे कृषी कायदे मागे घेईपर्यंत कॅप्टन भाजपमध्ये जाणार नाहीत, असे त्यांचे समर्थक सांगत आहेत. मात्र नवज्योत सिद्धूच अन्य पक्षात जातील, असे कॅप्टन सांगत आहेत.
दुसरीकडे सिद्धू यांनी राजीनामा मागे घ्यावा, यासाठी मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी यांनी आज त्यांच्याशी चर्चा केली. मंत्री परगटसिंग यांनाही मुख्यमंत्र्यांनी सिद्धू यांच्याकडे पाठवले. मात्र सिद्धू अडून आहेत. सरकारपेक्षा पक्ष व विचारसरणी अधिक महत्त्वाची असते. त्यामुळे सिद्धू यांचे नेतृत्व आपणास मान्य आहे, असे (पान ७ वर)
सिद्धूंची मनधरणी नकोच
नवज्योतसिंग सिद्धू यांची मनधरणी करू नये, असा मतप्रवास काँग्रेसमध्ये आहे. राहुल गांधी केरळमधून परतल्यावर नवा प्रदेशाध्यक्ष नेमायचा का, यावर निर्णय होईल, असे समजते. माजी प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड यांचे नाव आघाडीवर आहे. ते नाव कॅप्टन अमरिंदर सिंग यांनाही चालू शकेल. पण राहुल गांधी काँग्रेसचे खासदार व तरुण नेते रणवीरसिंग बिट्ट यांच्या नावाचा विचार करतील, असे सांगण्यात येते. ते ४६ वर्षांचे आहेत. पक्षाचे नेते हरीश रावत यांनी मात्र पंजाबमधील संकट लवकरच दूर होईल, असे सांगितले.
‘पूर्ण वेळ अध्यक्ष नसल्याने निर्णायकी स्थिती’ नवी दिल्ली : काँग्रेसला पूर्ण वेळ अध्यक्षच नसल्याने ही निर्णायकी स्थिती निर्माण झाली आहे, अशी टीका ज्येष्ठ काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी केली आहे. पक्षाचे आणखी एक नेते मनीष तिवारी यांनीही मंगळवारी अशाच आशयाचे विधान केले होते.
राजस्थानात सचिन पायलट यांना मुख्यमंत्री व्हायचे आहे, तर ते पद त्यांना दिल्यास मुख्यमंत्री अशोक गेहलोत व त्यांचे समर्थक बंड करतील, अशी शक्यता दिसत आहे. त्यामुळे सर्वच बाजूंनी काँग्रेसची पार कोंडी झाली आहे. ज्योतिरादित्य सिंदिया, जितीन प्रसाद, सुष्मिता देव, केरळचे व्ही. एम. सुधीरन यांनी पक्ष सोडूनही श्रेष्ठींना जाग आली नाही. अमरिंदर यांचा राजीनामा घेताना, नवा मुख्यमंत्री ठरवताना पक्षात चर्चा झाली नाही, नवज्योतसिंग सिद्धू यांच्यासह चार जणांनी पदे सोडली, पण पक्ष गप्पच आहे. अशा स्थितीत पक्ष दीर्घकाळ राहणे योग्य नसल्याचे सिब्बल यांनी नमूद केले. पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी कार्यकारिणीची लगेच बैठक बोलावून परिस्थितीवर चर्चा करावी, अशी मागणी कपिल सिब्बल व गुलाम नबी आझाद यांनी केली आहे.
आनंद शर्मा यांच्यासह अनेक नेत्यांचा त्यांना पाठिंबा आहे. सिब्बल यांनी तर रणदीप सुरजेवाला व के. सी. वेणुगोपाल हेच पक्षाचे सर्व निर्णय घेतात, अशी सूचक टीका केली आहे.