ऑनलाइन लोकमत
हरियाणा, दि. 16 - पंजाब प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. पंजाबचे 26 वे मुख्यमंत्री म्हणून कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी शपथ घेतली असून दुस-यांदा मुख्यमंत्री होण्याची संधी त्यांना मिळाली आहे. कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्यासोबत नऊ जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. नवज्योत सिंग सिद्धू यांना कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आलं आहे. सिद्धू यांना उपमुख्यमंत्रीपद दिलं जाण्याची शक्यता असल्याची चर्चा होती. मात्र अमरिंदरसिंग यांनी यासाठी नकार दिल्याने सिद्धूचं स्वप्न भंगलं. सिद्धू अमृतसर पूर्वमधून निवडणुक जिंकले आहेत.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जबरदस्त विजयासह दहा वर्षांनी मुख्यमंत्री म्हणून पंजाबमध्ये पुनरागमन करणार अमरिंदरसिंग यांनी राज्यात कोणीही दुस-या क्रमांकाचा नेता नको आहे. यासंबंधी त्यांनी पक्ष हायकमांडलाही कळवलं होतं.
विशेष गोष्ट म्हणजे अमरिंदरसिंग यांनी शपथ घेत एक नवा इतिहास रचला आहे. 1966 पासून पंजाबमध्ये काँग्रेसचे आतापर्यंत एकूण पाच मुख्यमंत्री राहिले आहेत. मात्र यामधील कोणीही दुस-यांदा मुख्यमंत्री होऊ शकलं नाही. अमरिंदसिंग दहा वर्षांनी पंजाबची दुस-यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेत आहेत.
#FLASH Navjot Singh Sidhu sworn in as a cabinet minister of Punjab govt pic.twitter.com/TMYNhR5cH0— ANI (@ANI_news) March 16, 2017
दरम्यान काँग्रेसच्या नवनिर्वाचित आमदारांची रविवारी चंदीगडच्या सेक्टर-१५ येथील पंजाब काँग्रेस मुख्यालयात बैठक पार पडली. या बैठकीत कॅप्टन अमरिंदरसिंग यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी एकमताने निवड करण्यात आली. बैठकीला काँग्रेसच्या पंजाब प्रभारी आशा कुमारी उपस्थित होत्या. राज्यात काँग्रेसची सत्ता आल्यास कॅप्टन अमरिंदरसिंग हेच मुख्यमंत्री बनतील, असे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आधीच जाहीर केले होते. त्यामुळे या बैठकीत केवळ औपचारिकता म्हणून कॅप्टन अमरिंदरसिंग यांची नेतेपदी निवड करण्यात आली.
कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्या बळावर काँग्रेसने विधानसभेच्या ११७ जागांपैकी ७७ जागा जिंकल्या आहेत.
तत्पूर्वी मावळते मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांनी राज्यपालांना भेटून आपल्या पदाचा राजीनामा सादर दिला. राज्यपालांनी बादल यांना पर्यायी व्यवस्था होईपर्यंत पदावर कायम राहण्याचा सल्ला दिला.
#FLASH: Manpreet Singh Badal sworn in as cabinet minister of Punjab Government pic.twitter.com/HFNsfcFrU6— ANI (@ANI_news) March 16, 2017
अकाली दल-भाजपाच्या पराभवाबद्दल बोलताना प्रकाशसिंग बादल म्हणाले, ‘युतीच्या पराभवाची समीक्षा केली जाईल. हा जनादेश आम्ही मान्य करतो.’ या निवडणुकीत अकाली दलाला केवळ १५ तर भाजपाला ३ जागांवर समाधान मानावे लागले आहे. राज्यपालांनी बादल यांचा राजीनामा स्वीकारल्यानंतर विधानसभा विसर्जित केली. आता नवनिर्वाचित आमदारांच्या शपथविधीसाठी नव्या विधानसभेचे अधिवेशन १८ मार्च रोजी बोलावण्यात येण्याची शक्यता आहे.