नवी दिल्ली - केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी पुकारलेले आंदोलन दिवसागणिक अधिकाधिक तीव्र होत आहे. आज आंदोलनाच्या १९ व्या दिवशी आंदोलक शेतकरी दिल्लीतील सर्व एंट्री पॉईंटवर उपोषणावर बसले आहेत. तर दिल्लीतील सत्ताधारी आम आदमी पक्षानेही शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ आज उपोषण सुरू केले आहे. दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावरून पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यावर जोरदार टीका केली आहे. अमरिंदर सिंग यांनी मुलावरील ईडीची केस मागे घेण्यासाठी शेतकरी आंदोलन विकले, असा आरोप केजरीवाल यांनी केला.पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी अरविंद केजरीवाल यांनी शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ ठेवलेले उपोषण हे नाटक असल्याची टीका केली होती. त्या टीकेला प्रत्युत्तर देताना केजरीवाल यांनी अमरिंदर सिंग यांच्यावर जोरदार आरोप केले. ईडीकडील केस माफ व्हावी यासाठी अमरिंदर सिंग यांनी केंद्र सरकारसोबत सेटिंग केल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला. ते म्हणाले की, कॅप्टनजी मी सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांसोबत आहे. मी दिल्लीतील स्टेडियमना जेलमध्ये परिवर्तीत होऊ दिलं नाही. केंद्र सरकारसोबत लढलो आहे. मी शेतकऱ्यांचा सेवेकरी बनून त्यांची सेवा करत आहे. तुम्ही तर तुमच्या मुलावरील ईडीची केस माफ व्हावी यासाठी केंद्र सरकारसोबत सेटिंग केली आहे. शेतकऱ्यांचे आंदोलन विकले? पण का?
"कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मुलाची ईडी चौकशी थांबवण्यासाठी शेतकरी आंदोलन विकले’’
By बाळकृष्ण परब | Published: December 14, 2020 3:36 PM