नवी दिल्ली - कॅप्टन अमरिंदर सिंग (Amarinder Singh) यांनी पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्याने काँग्रेस (Congress) अंतर्गत राजकारणात खळबळ उडाली. आता काँग्रेसने ज्याला हवे त्याला मुख्यमंत्री बनवावे, अशी उद्विग्न प्रतिक्रिया अमरिंदर सिंग यांनी राजीनाम्यानंतर दिली. अमरिंदर सिंग यांनी राज्यपालांकडे राजीनामा सोपवल्यानंतर पक्षामध्ये माझा अपमान होत असल्याचे सांगितले. पक्षाला माझ्याबाबत शंका का होती. हे मला समजत नाही आहे असं देखील म्हटलं आहे. यानंतर आता अमरिंदर यांनी पक्षात आपल्यासारख्या वरिष्ठ नेत्याला अशी वागणूक दिली जात असेल तर सामान्य कार्यकर्त्याचं काय होत असेल, असा सवाल केला आहे.
"काँग्रेसमध्ये रागाला स्थान नाही, पण अपमान आणि छळासाठी आहे?" असं म्हणत पुन्हा एकदा अमरिंदर सिंग यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. अमरिंदर यांनी काँग्रेस प्रवक्त्या सुप्रीया श्रीनेत यांच्या विधानाचा देखील चांगलाच समाचार घेतला. पक्षात रागाला स्थान नाही, असं उत्तर त्यांनी अमरिंदर यांच्या टीकेला दिलं होतं. त्यानंतर आता अमरिंदर सिंग यांनी सुप्रीया श्रीनेत यांनी उत्तर दिलं आहे. "हो, राजकारणात रागाला कुठलंली स्थान नाही. पण काँग्रेससारख्या इतक्या जुन्या पक्षात अपमान आणि छळ करण्यासाठी जागा आहे?" असा सवाल त्यांनी केला आहे.
"काँग्रेसमध्ये वरिष्ठ नेत्याला अशी वागणूक दिली जात असेल तर सामान्य कार्यकर्त्याचं काय होत असेल?"
"माझ्यासारख्या वरिष्ठ नेत्याला अशी वागणूक दिली जातेय, सर्वसामान्य कार्यकर्त्यांसोबत काय होत असेल?" असं देखील कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्रिपद सोडावे लागल्यानंतर आता नवज्योत सिंग सिद्धूविरोधात थेट मोर्चा उघडला आहे. 2022 च्या विधानसभा निवडणुकीत सिद्धूला पराभूत करण्यासाठी त्याच्याविरोधात एक प्रबळ उमेदवार उभा करणार असल्याचे संकेत कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी दिले आहेत. तसेच काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्याकडे पुरेसा अनुभव नसल्याचे विधान त्यांनी केले.
"राहुल-प्रियंका अनुभवहीन, सिद्धूंना मुख्यमंत्री बनण्यापासून रोखणार’’
अमरिंदर सिंग यांनी "मी नवज्योत सिंग सिद्धूला पंजाबचा मुख्यमंत्री बनण्यापासून रोखण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावेन. जर पक्षाने सिद्धूला मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार बनवले तर मीसुद्धा त्याला रोखण्यासाठी सज्ज आहे. नवज्योत सिंग सिद्धू हा धोकादायक माणूस आहे. अशा लोकांपासून देशाला वाचवण्याची गरज आहे. सिद्धूला हरवण्यासाठी 2022 च्या विधानसभा निवडणुकीत त्याच्याविरोधात एक प्रबळ उमेदवार उतरवला जाईल. सिद्धू राज्यासाठी धोकादायक आहे. त्याला रोखण्यासाठी मी कुठलेही पाऊल उचलेन" असं म्हटलं आहे.