Amarnath Cloudburst: भारतातील पवित्र तीर्थक्षेत्र असलेल्या अमरनाथ गुहेजवळ भीषण ढगफुटी झाली आहे. या घटनेत आतापर्यंत 10 भाविकांचा मृत्यू झाला, तर अनेकजण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, गुहेजवळ ढगफुटीनंतर अचानक पूर आला. आता मुद्दा असा आहे की, अनेकदा ढगफुटीच्या घटना फक्त डोंगराळ भागातच का घडतात? डोंगरावर ढगफुटी होण्याचे नेमके कारण काय? जाणून घेऊ याचे कारण...
ढगफुटी म्हणजे काय?ढगफुटी म्हणजे ढगाचे तुकडे झाले असा अर्थ होत नाही. हवामान तज्ज्ञांच्या मते, जेव्हा अचानक एखाद्या ठिकाणी मुसळधार पाऊस पडतो तेव्हा त्याला ढगफुटी म्हणतात. तुम्ही हे अशा प्रकारे समजू शकता की, पाण्याने भरलेला फुगा फुटला तर सर्व पाणी एकाच ठिकाणी वेगाने खाली पडू लागते. अशाच प्रकारे ढगफुटीमध्ये पाण्याने भरलेल्या ढगातून पाणी एकाच ठिकाणी वेगाने पडते. याला फ्लॅश फ्लड किंवा क्लाउड बर्स्ट असेही म्हणतात.
ढग अचानक का फुटतात?जेव्हा भरपूर पाणी भरलेले ढग एकाच ठिकाणी बराचवेळ राहतात तेव्हा ढगफुटी होते. ढगात असलेले पाण्याचे थेंब एकमेकांत मिसळतात. यामुळे ढगांची घनता थेंबांच्या वजनाने वाढते. यानंतर अचानक मुसळधार पाऊस सुरू होतो. ढगफुटीमुळे 100 मिमी प्रति तास या वेगाने पाऊस पडू शकतो.
पर्वतांवर ढग का फुटतात?पाण्याने भरलेले ढग डोंगराळ भागातच अडकतात. पर्वतांच्या उंचीमुळे ढग पुढे जाऊ शकत नाहीत. त्यानंतर त्याच ठिकाणी अचानक मुसळधार पाऊस सुरू होतो. काही सेकंदात 2 सेमीपेक्षा जास्त पाऊस पडतो. ढग फुटणे सहसा पर्वतांवर 15 किमी उंचीवर होतो. डोंगरावर ढगफुटीमुळे एवढा पाऊस पडतो की त्याचा पूर होतो आणि खाली येणारे पाणी आपल्यासोबत माती, दगड घेऊन येतो. त्याचा वेग इतका वेगवान असतो की, समोर जे काही येते ते उद्ध्वस्त होते.
ढगफुटीच्या घटनाढगफुटी फक्त डोंगराळ भागात आणि डोंगरांमुळेच होते असे नाही. 26 जुलै 2005 रोजी मुंबईत ढगफुटीच्या घटनेनंतर ही धारणा बदलली आहे. आता असे मानले जाते की, ढग काही विशिष्ट परिस्थितीत फुटतात. जिथे ही परिस्थिती निर्माण केली जाते तिथे ढगफुटी होऊ शकते. अनेक वेळा ढगांच्या वाटेवर अचानक उष्ण हवेचा झोत आला तरी ढग फुटतात. मुंबईची घटना यामुळे घडली होती.