रामबन/जम्मू : अमरनाथ यात्रेला निघालेल्या भाविकांची बस रविवारी दुपारी जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर नचलानात (जिल्हा रामबन) खोल दरीत पडून, दोन महिलांसह १७ जण ठार तर ३१ जण जखमी झाले. जखमींपैकी २१ जण अतिशय गंभीर जखमी असून, त्यांना उचारासाठी तत्काळ हवाईमार्गाने जम्मू येथे नेण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अपघाताबद्दल दु:ख व्यक्त करून त्यांच्या नातेवाईकांच्या दु:खात मी सहभागी असल्याचे म्हटले.मृत भाविक उत्तर प्रदेश, बिहार, आसाम, राजस्थान, हरियाणा आणि मध्य प्रदेशातील आहेत. ही बस जम्मू-काश्मीर परिवहन महामंडळाची होती. जम्मू येथून ३,६०३ यात्रेकरूंना घेऊन निघालेल्या ताफ्यात ही बस होती. पोलीस, लष्कर आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांनी स्थानिकांच्या मदतीने मदत, बचाव कार्य केले आणि दरीतून मृतदेह व जखमींना वर आणले, असे असे वरिष्ठ पोलीस अधीक्षक मोहन लाल यांनी सांगितले. यात्रेकरूंच्या बसवर १० जुलैच्या रात्री अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात जखमी झालेल्या ललिता (४७) यांचा रुग्णालयात आज मृत्यू झाला.
अमरनाथ यात्रेकरूंची बस दरीत कोसळली, १७ भाविकांचा मृत्यू
By admin | Published: July 17, 2017 3:09 AM