नवी दिल्ली : कोरोना साथीमुळे सलग दुसऱ्या वर्षी अमरनाथ यात्रा रद्द करण्यात आली आहे. मागील वर्षीही ही यात्रा रद्द करण्यात आली होती. ५६ दिवसीय अमरनाथ यात्रा २८ जूनपासून दोन्ही मार्गांवरून सुरू होणार होती, तर २२ ऑगस्ट रोजी समाप्त होणार होती. मात्र, कोरोना साथीमुळे यंदाही ही यात्रा रद्द करण्यात आली आहे.
नायब राज्यपालांच्या कार्यालयाने ट्विट केले आहे की, लोकांचे जीव महत्त्वाचे आहेत. त्यामुळे यंदा यात्रा आयोजित करणे योग्य नाही. ही यात्रा यंदा केवळ प्रतीकात्मक असेल. सर्व धार्मिक कार्यक्रम मंदिरात होतील. अमरनाथ मंदिरात होणारी सकाळ, संध्याकाळची आरती लोकांना ऑनलाइन पाहता येईल, दर्शन घेता येईल. बोर्डाच्या सदस्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर नायब राज्यपालांनी मुख्य सचिव अरुण कुमार मेहता, पोलीस महासंचालक दिलबाग सिंग आदींशी चर्चा केली. त्यानंतर हा निर्णय जाहीर करण्यात आला.