जम्मू: कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता अमरनाथ यात्रा रद्द (Amarnath Yatra 2020 Cancelled) करण्यात आली आहे. यंदा २१ जुलै ते ३ ऑगस्ट या कालावधीत अमरनाथ यात्रेचं आयोजन करण्यात येईल, असं म्हटलं जात होतं. तशी शक्यता वर्तवण्यात येत होती. याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी 'प्रथम पुजे'चं आयोजनही करण्यात आलं होतं. मात्र अचानक अमरनाथ श्राईन बोर्डाच्या (एमएसबी) अधिकाऱ्यांनी यात्रा रद्द करण्यात आल्याची माहिती दिली. दरवर्षी जून महिन्यात अमरनाथ यात्रेला सुरुवात होते.याआधी एप्रिलमध्ये अमरनाथ श्राईन बोर्डानं अमरनाथ यात्रा रद्द करत असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर एक प्रसिद्धीपत्रकदेखील जारी करण्यात आलं. मात्र थोड्याच वेळात जम्मू काश्मीरच्या माहिती संचलनालयानं यात्रा रद्द करण्याचा आदेश मागे घेतला. दरवर्षी हजारो भाविक अमरनाथची यात्रा करतात. जून महिन्यात अमरनाथ श्राईन बोर्ड या यात्रेचं आयोजन करतं.दरवर्षी एप्रिलमध्ये सुरू होते नोंदणी प्रक्रियाअमरनाथा यात्रेसाठी दरवर्षी एप्रिलमध्ये नोंदणी प्रक्रिया सुरू होते. मात्र यंदा कोरोना संकटामुळे नोंदणी प्रक्रिया सुरू होऊ शकली नाही. २००० मध्ये अमरनाथ श्राईन बोर्डची स्थापना करण्यात आली. जम्मू काश्मीरचे राज्यपाल किंवा उपराज्यपाल या बोर्डचे चेअरमन असतात.गेल्या वर्षी मध्येच स्थगित करण्यात आली होती यात्रागेल्या वर्षी अमरनाथ यात्रा मध्येच स्थगित करण्यात आली होती. सुरक्षेच्या कारणास्तव यात्रा रद्द करण्यात येत असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं होतं. यानंतर लगेचच मोदी सरकारनं जम्मू काश्मीरमधील कलम ३७० रद्द करत असल्याचा मोठा निर्णय जाहीर केला. यात्रा रद्द करण्यात आल्यामुळे साडे तीन लाख भाविक माघारी परतले. अमरनाथ यात्रेसाठी दरवर्षी देशासोबतच परदेशांमधूनही भाविक मोठ्या संख्येनं येतात.