ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 12- दहशतवाद्यांनी सोमवारी रात्री अमरनाथ यात्रेला निघालेल्या यात्रेकरूंच्या बसवर अनंतनाग जिल्ह्यात अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात बसमध्ये असलेल्या 7 यात्रेकरूंचा मृत्यू झाला. पण यात्रेकरूंवर हल्ला होऊनही अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या भाविकांची संख्या कमी न होता वाढलेली बघायला मिळाली. सोमवारी हल्ला झाल्यानंतर मंगळवारी आदल्या दिवशीपेक्षा जास्त भाविक यात्रेसाठी रवाना झाले. ""बम बम भोले"" चा जयघोष करत 3289 यात्रेकरूंचा जत्था मंगळवारी सकाळी 105 बसेसमधून पहलगाम आणि बालटाल मार्गावरुन आपल्या पुढील यात्रेसाठी रवाना झाला. विशेष म्हणजे सोमवारी 75 बसेसमधून 2500 पेक्षा कमी यात्रेकरू यात्रेसाठी गेले होते. द टाइम्स ऑफ इंडियाने ही बातमी दिली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, काही यात्रेकरूंनी पहलगमच्या पारंपारिक रस्त्यावरून प्रवासाला सुरूवात केली तर काही जण बालटाल मार्गे रवाना झाले.
बुधवारीसुद्धा यात्रीनिवासातून प्रवासाला निघणाऱ्या यात्रेकरूंची संख्या वाढू शकते. बुधवारी सकाळी 3716 यात्रेकरू प्रवासाला निघणार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं. या 3716 यात्रेकरूंमध्ये 764 महिला, 417 साधू आणि 41 लहानमुलांचा समावेश आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा यात्रेकरूंच्या संख्येवर काहीही परिणार झाला नसून यात्रा सुरळीत सुरू होते आहे, असं अमरनाथ यात्रा बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी उमंग नरूला यांनी सांगितलं आहे. जम्मू-काश्मीरचे राज्यपाल एन.एन वोहरा यांनी बुधवारी सकाळी बैठक बालावून यात्रेतील सुरक्षेच्या उपाययोजनांचा आढावा घेतला.
आणखी वाचा
कसा झाला हल्ला ?
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी (11 जुलै ) ज्या बसने हे यात्रेकरू निघाले होते, ती मुख्य यात्रेचा भाग नव्हती आणि अमरनाथ देवस्थान बोर्डाकडे त्या बसची नोंदही नव्हती. त्यामुळे त्या बसला केंद्रीय राखीव पोलीस दलाची सुरक्षा पुरवण्यात आली नव्हती. बस अनंतनाग जिल्ह्यातून जात असताना रात्री 8 वाजून 20 मिनिटांनी दहशतवाद्यांनी तिच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. त्या गोळीबारात सहा जण जागीच तर एकाचा रुग्णालयात नेताना मृत्यू झाला.
ही बस सोनमर्गहून आली होती. अमरनाथांचे दर्शन घेतल्यानंतर याचमार्गे यात्रेकरू जम्मूच्या मार्गावर होते. रात्री सात वाजेनंतर महामार्गावर यात्रेकरूंचे वाहन चालविण्याची परवानगी नाही. असे स्पष्ट निर्देश असताना यात्रेकरूंसाठी असलेल्या वाहतूक नियमांचे बसचालकाने उल्लंघन केले, असा दावा पोलिसांनी केला आहे.
यात्रेकरूंच्या सुरक्षेसाठी जम्मूतील यात्रेकरूंच्या तळापासून ते काश्मीरमधील पहलगाम किंवा बाल्टालस्थित यात्रेकरूंचा तळ एसओजी आणि सीआरपीएफच्या निगराणीखाली असतो. वाहन नोंदणीकृत नसताना ही बस अमरनाथपर्यंत कशी गेली; हे मोठे गौडबंगाल आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांच्याशी संपर्क साधून हल्ल्याचा तपशील मागवला.
लाखाहून अधिक यात्रेकरू
यात्रा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वांत जवळचा बलतालहून जाणारा मार्ग व पहेलगामवरून जाणारा पारंपरिक मार्ग अशा दोन्ही मार्गांनी मिळून रविवारी १०,७६३ यात्रेकरूंनी यात्रा पूर्ण केली होती. अशा प्रकारे यंदा यात्रा पूर्ण केलेल्या यात्रेकरूंची संख्या रविवार रात्रीपर्यंत १,२६,६०४ झाली होती.