जम्मू/श्रीनगर : काश्मीर खोऱ्याच्या अनेक भागांत सुरू असलेल्या पावसामुळे अमरनाथ यात्रा शुक्रवारी (दि. ७) तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. बालटाल व पहलगाम या दोन्ही मार्गांवरील यात्रा पुढे ढकलण्यात आली असून शुक्रवारी सकाळी एकाही भाविकाला गुहेकडे जाण्याची मुभा देण्यात आली नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
जिल्ह्यातील चंद्रकोट भागात यात्रा स्थगित करण्यात आली आहे, असे वरिष्ठ पोलिस अधीक्षक (रामबन) मोहिता शर्मा म्हणाल्या. शुक्रवारी सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू झाला. त्यामुळे यात्रेकरूंना बालटाल व नूनवान येथील शिबिरांत ठेवले आहे. तत्पूर्वी, सात हजारांहून अधिक भाविकांची एक तुकडी पहाटे जम्मूच्या तळ शिबिरांहून अमरनाथ यात्रेसाठी रवाना झाली होती. हवामान सुधारताच यात्रा पुन्हा सुरू करण्यात येईल. दरम्यान, खराब हवामानामुळे अडकून पडलेल्या महाराष्ट्रातील ६० भाविकांची सुटका करण्यात आली.
भाविकांची संख्या ८४ हजारांच्या पुढेयावर्षी ३० जून रोजी यात्रा सुरू झाल्यापासून जम्मूतील तळ शिबिरातून एकूण ४३,८३३ यात्रेकरू खोऱ्याकडे रवाना झाले आहेत. हिमलिंगमचे दर्शन घेणाऱ्या यात्रेकरूंची संख्या ८४,००० च्या पुढे गेली आहे. (वृत्तसंस्था)