नवी दिल्ली - दिल्लीतील एम्सच्या न्यूरो एनेस्थेटिक टीमला (Neuro Anaesthetic) एक मोठं यश मिळालं आहे. डॉक्टरांच्या टीमने एका 24 वर्षीय तरुणीला पूर्ण बेशुद्ध न करताच तिच्या मेंदूचं ऑपरेशन केल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे ही सर्जरी यशस्वी झाली आहे. ऑपरेशनचा एक व्हिडीओ देखील आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. एम्स रुग्णालयातीलडॉक्टर ऑपरेशन करत होते आणि तरुणी स्वतःवर ऑपरेशन होत असताना हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) म्हणत होती. सर्वत्र डॉक्टरांच्या टीमचं भरभरून कौतुक केलं जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानच्या बिकानेरमध्ये देखील काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारची एक घटना घडली आहे. एका व्यक्तीची ब्रेन ट्यूमरची सर्जरी करायची होती. मात्र ही व्य़क्ती सर्जरी करायला खूप जास्त घाबरत होती. त्यामुळेच डॉक्टरांनी त्यांना बेशुद्ध न करता सर्जरी करण्याचा सल्ला दिला. डॉक्टरांनी खूप समजावून सांगितल्यानंतर रुग्ण हे करण्यास तयार झाला. शारीरीक त्रास जाणवू नये यासाठी काही प्रयत्न करण्यात आलं. याच दरम्यान हा रुग्ण देखील हनुमान चालिसाचा जप करत होता. त्याचं ऑपरेशन देखील यशस्वी झालं आहे.
मेंदूचं ऑपरेशन होत असताना रुग्ण हनुमान चालिसा वाचत असल्याचा मोठा फायदा झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. मेंदुतील आवाजावर नियंत्रण ठेवणारा भाग त्यामुळे संतुलित राहतो आणि रुग्ण एका सलग आवाजात बोलत राहिल्याने हा भाग जागृत राहतो, असं डॉक्टरांनी म्हटलं आहे. काही तासांच्या या शस्त्रक्रियेत डॉक्टरांनी मेंदूतील गाठ यशस्वीपणे बाहेर काढण्यात यश मिळवलं. डॉक्टरांच्या या टीमचं सर्वत्र कौतुक होत आहे. एखाद्या व्यक्तीचं ऑपरेशन असलं की नातेवाईक देवाचा धावा करतात. पण इथे रुग्णचं हनुमान चालिसा वाचत असल्याचं समोर आलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
काही महिन्यांपूर्वी आंध्र प्रदेशमध्ये अशीच एक घटना घडली होती. एका रुग्णाची ओपन ब्रेन सर्जरी करायची होती. मात्र ऑपरेशनच्या वेळी रुग्णाला झोपायची परवानगी नव्हती अशा परिस्थितीत डॉक्टरांनी अनोखी शक्कल लढवली. रुग्णाला त्याचा आवडता टीव्ही शो 'बिग बॉस' आणि हॉलिवूड चित्रपट 'अवतार' दाखवला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे रुग्ण या गोष्टी लॅपटॉपवर पाहत असेपर्यंत शस्त्रक्रिया करण्यात आली होती. ओपन ब्रेन शस्त्रक्रियेद्वारे रुग्णाच्या मेंदूत डाव्या बाजूला असलेल्या प्रीमोटर क्षेत्रातील ग्लिओमा काढून टाकायचा होता. यासाठी डॉक्टरांनी त्याला शस्त्रक्रिया संपेपर्यंत लॅपटॉपवर बिग बॉस आणि अवतार सिनेमा दाखवला होता.