अयोध्या : प्रतिष्ठापना सोहळ्यासाठी अयोध्येतील भगवान रामाच्या मंदिरात हजारो फुलांनी अप्रतिम सजावट करण्यात आली आहे. दिव्यांच्या रोषणाईने अवघे राम मंदिर उजळून निघाले आहे.
रामजन्मभूमी संकुलात जमिनीवर हजारो फुलांच्या सहाय्याने आकर्षक पुष्परचना करण्यात आल्या आहेत. सध्या थंडीचे दिवस असल्याने ही फुले लवकर कोमेजणार नाहीत. प्राणप्रतिष्ठेच्या दिवसापर्यंत ती टवटवीत राहतील असे सूत्रांनी सांगितले. श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या मार्गदर्शनाखाली या पुष्परचना करण्यात आल्या आहेत. राम मंदिराची वास्तू व सभोवतालचा परिसर दिव्यांच्या रोषणाईने उजळला आहे. मात्र, मंदिराच्या गाभाऱ्यात पारंपरिक पद्धतीच्या दिव्यांचीच रोषणाई करण्यात आली आहे.
म्हैसूर येथील अरुण योगिराज या शिल्पकाराने तयार केलेली रामलल्लाची ५१ इंच उंचीची मूर्ती राम मंदिराच्या गाभाऱ्यात गुरुवारी दुपारी बसविण्यात आली. या मंदिरात पूर्व दिशेने प्रवेश मिळणार असून, मंदिराबाहेर जाण्याचा रस्ता दक्षिण दिशेला आहे. राम मंदिराची बांधणी नागर शैलीत करण्यात आली आहे. हे मंदिर ३८० फूट लांब व २५० फूट रुंद व १६१ फूट उंच आहे. (वृत्तसंस्था)
‘राम आये है अयोध्या में’ कॉलर ट्युन लोकप्रिय
राम आये है अयोध्या में ही मोबाइल फोनची कॉलर ट्यून खूप लोकप्रिय झाली आहे. या शहरात काही ठिकाणी खांबांवर धनुष्य-बाणाची प्रतिकृती उभारण्यात आली आहे. त्यावर राम असे लिहिले आहे. भगवान राम व मंदिराची चित्रे असलेले भगवे ध्वज विक्रीसाठी उपलब्ध आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची व राम मंदिराची छायाचित्रे असलेले फलकही संस्थांनी अयोध्येत लावले आहेत.
नामवंत कंपन्यांनी लावले स्वागताचे बॅनर्स
राम मंदिराचे चित्र व्हिजिटिंग कार्ड, पोस्टर, कॅलेंडर अशा अनेक ठिकाणी आवर्जून छापले जात आहे. सर्व नामवंत कंपन्यांनी राम मंदिराचे स्वागत करणारे फलक अयोध्या नगरीत लावले आहेत. अयोध्या की गरिमा असा हॅशटॅग असलेला एक फलक रेल्वे स्टेशनसमोर लावण्यात आला असून, त्यावर भगवान राम व राम मंदिराचे चित्र आहे. अयोध्येतील सर्व मंदिरे, बस, रस्ते, हजारो लोकांच्या मोबाइलची कॉलर ट्यून या सर्वच ठिकाणी भगवान राम, राम मंदिर यांचाच प्रभाव आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मासुंदा तलावाकाठी महाआरती
अयोध्या येथे राम मंदिर व्हावे, हे बाळासाहेबांचे स्वप्न होते. हे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साकार केल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. सोमवारी राम मंदिराचे उद्घाटन आणि राम मूर्ती प्रतिष्ठापना होणार आहे. यानिमित्त शनिवारी मुख्यमंत्री शिंदे यांनी मासुंदा तलावाकाठी उभारलेल्या तरंगत्या रंगमंचावर महाआरती केली.महाआरतीपूर्वी श्री कौपिनेश्वर मंदिर ते मासुंदा तलावापर्यंत राम मंदिराच्या प्रतिकृतीची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत शिंदे सहभागी झाले होते. या मिरवणुकीमुळे मासुंदा तलाव परिसर, राम मारुती रोड, चरई भागात वाहतूककोंडी झाली.