गुजरातमधील सुरत शहरातील डुम्मस बिचवर एक आश्चर्यकारक घटना घडली आहे. येथे कुटुंबीयांसह फिरायला गेलेला एक १४ वर्षांचा मुलगा समुद्रात पोहताना लाटांसोबत वाहून गेला. त्याचा बुडून मृत्यू झाला असं समजून कुटुंबीय शोकाकूल झाले. त्याच्या मृतदेहाचा समुद्रात शोध सुरू होता. मात्र त्याचवेळी एक आश्चर्यकारक घटना घडली. हा मुलगा तब्बल ३६ तासांनंतर समुद्रात जिवंत सापडला. त्याची सुखरूप सुटका झाल्यानंतर या मुलाने आपल्याला गणपती बाप्पानेच वाचवल्याची भावूक प्रतिक्रिया दिली.
त्याचे झाले असे की, २९ सप्टेंबर रोजी लखन देवीपूजक हा १४ वर्षांचा मुलगा सूरतमधील डुम्मस बिचवर कुटुंबीयांसह फिरायला गेला होता. तिथे कुटुंबीयांनी मनाई केल्यानंतरही हट्टाने तो पोहण्यासाठी उतरला. तसेच लाटांच्या तडाख्यात सापडून तो समुद्रात वाहून गेला. हा प्रकार पाहताच कुटुंबीयांनी आक्रोश सुरू केला. त्यानंतर सूरत पोलिसांनी पाणबुडे आणि इतरांच्या मदतीने या मुलाचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र त्याचा काही शोध लागला नाही.
दरम्यान, या घटनेला ३६ तास उलटत आल्यानंतर लाटांसोबत वाहून गेलेला मुलगा समुद्रात तरंगताना आढळला. त्याचं झालं असं की, समुद्रात वाहून गेलेल्या लखनला विसर्जनानंतर समुद्राच्या पाण्यात तरंगत असलेली एक गणेशमूर्ती सापडली. या गणेशमूर्तीचा आधार घेऊन तो खोल समुद्रात तरंगत राहिला. त्यानंतर काही मच्छिमारांची त्याच्यावर नजर पडली. त्यांनी या मुलाला सुखरूप बाहेर आणले. त्याला पाहताच कुटुंबीयांच्या आनंदाला पारावार उरला नाही. तर आपल्याला गणपती बाप्पानेच वाचवल्याची प्रतिक्रिया या मुलाने दिली.