नवी दिल्ली : गेल्या वर्षी व्हलेंटाईन डेच्या दिवशीच दक्षिण काश्मीरच्या पुलवामामध्ये केंद्रीय राखील पोलिस दलाच्या तुकडीवर मोठा आत्मघाती हल्ला झाला होता. या स्फोटामध्ये सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले होते. या प्रकरणातील मुख्य आरोपी जागीच ठार झाला होता. मात्र, आता वर्षभरानंतर या हल्ल्याच्या तपासाला गती आली आहे. गेल्या आठवडाभरात तपास अधिकाऱ्यांनी पाच जणांना ताब्यात घेतले असून य़ामध्ये एका पिता-मुलीचाही समावेश आहे.
आता त्यांच्या चौकशीतून मोठमोठे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. 14 फेब्रुवारी, 2019 ला पुलवामामध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर स्फोटकांनी भरलेली कार आदळविण्यात आली होती. या प्रकरणी एनआयएने श्रीनगरमधील बाग-ए-मेहताब भागातील वजीर-उल-इस्लाम (19) आणि पुलवामाच्या हकीपुरा गावातील मोहम्मद अब्बास राठेर (32) या दोघांना ताब्यात घेतले आहे.
प्राथमिक चौकशीमध्ये इस्लामने सांगितले आहे की, जैश-ए-मोहम्मदच्या पाकिस्तानी दहशतवाद्यांनी दिलेल्या आदेशांनुसार त्याने आयईडी बॉम्ब बनविण्यासाठी रसायन, बॅटरी आणि अन्य सामुग्री खरेदी करण्यासाठी त्याच्या ऑनलाईल शॉपिंग अकाऊंटचा वापर केला आहे, असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. त्याने या वस्तू अॅमेझॉनवरून मागवून त्या जैशच्या दहशतवाद्यांपर्यंत पोहोचविल्या. राठेरनेही जैशचा आयईडी ब़ॉम्ब बनविणारा तज्ज्ञ मोहम्मद उमर जेव्हा मे 2018 मध्ये काश्मीरमध्ये आला होता, तेव्हा त्याला घरामध्ये राहण्यास दिले होते.
याशिवाय राठेरने पुलवामा हल्ल्यातील दहशतवादी आदिल अहमद डार, समीर डार आणि पाकिस्तानी कामरान याला त्याच्या घरामध्ये रहायला दिले होते. याशिवाय त्याने या दहशतवाद्यांना हकरीपुरामध्ये तारिक शाह आणि त्याची मुलगी इंशा जान यांच्या घरातही राहण्यासाठी मदत केली होती.