नवी दिल्ली : अॅमेझॉनचे मालक जेफ बेजोस यांनी भारतात 1 अब्ज डॉलर (7000 कोटी रुपये) गुंतविण्याची घोषणा केली आहे. यावर केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयुष गोयल यांनी अॅमेझॉनला सुनावले आहे.
अॅमेझॉनने भारतामध्ये गुंतवणुकीची घोषणा करून काही उपकार नाही केलेत. ई-कॉमर्सच्या गुंतवणूकदारांनी देशाच्या कायद्यांमधील कमतरतेचा फायदा उठविता नये. अॅमेझॉनविरोधात ई-कॉमर्सच्या नियमांच्या उल्लंघनप्रकरणी चौकशी सुरू आहे.
गोयल यांनी अशावेळी ट्वीट केले आहे, जेव्हा जेफ बेजोस महत्वाच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. अनेकदा मी सांगितले आहे की भारतीय नागरिक आणि सर्व गुंतवणूकदारांनी कायद्याचे पालन करावे. भलेही त्यांनी त्यांच्या व्य़ापारामध्ये एक अब्ज डॉलर टाकले असतील आणि त्यांना तेवढेच नुकसान झाले असेल. याची भरपाई त्यांनाच करावी लागेल. यामुळे ते जर भारतात गुंतवणूक करत असतील तर ते देशावर उपकार करत नसल्याचे गोयल यांनी म्हटले आहे.
तसेच सरकारने ई कॉमर्स कंपन्यांना देशात गुंतवणूक करण्याची मंजुरी दिली आहे. मात्र जोपर्यंत निय़मांमध्ये राहून ते काम करतात तोपर्य़ंतच त्यांचे स्वागत करण्यात येईल असा इशाराही गोयल यांनी दिला आहे.
भारतीय प्रतिस्पर्धा आयोग अॅमेझॉनविरोधात एफडीआय नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी चौकशी करत आहे. अनेक छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांनी अॅमेझ़ॉनविरोधात तक्रार केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, फेस्टिव्ह सिझनमध्ये मोठी सूट देऊन नियमांचे उल्लंघन केले आहे. याच प्रकरणात फ्लिपकार्ट विरोधातही चौकशी सुरू आहे.