नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ उपक्रमात आता अॅमेझॉन ही ई-कॉमर्स कंपनीही सहभागी होणार असून, तिच्याद्वारे भारतातील उत्पादकांना जागतिक बाजारपेठ खुली होणार आहे. येत्या पाच वर्षांमध्ये १0 अब्ज डॉलरच्या भारतीय उत्पादनांची निर्यात अॅमेझॉन करणार आहे.
अॅमेझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ बेझॉस सध्या भारतात असून, त्यांनी बुधवारी दिल्लीत उद्योजकांच्या परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले की, २0१५ पर्यंत आमची कंपनी १0 अब्ज डॉलरच्या भारतीय वस्तूंची निर्यात करेल. त्यासाठी भारतात १ अब्ज डॉलरची गुंतवणूक अॅमेझॉन करेल. त्यांची पुरवठा साखळी मजबूत करण्यासाठी ही गुंतवणूक असली, तरी त्याचा फायदा लघू व मध्यम उद्योजकांनाही होईल, असे सांगून ते म्हणाले की, भारतातील लघू व मध्यम उद्योजकांना डिजिटल उपकरणांनी सज्ज केल्याचा फायदा आमच्याप्रमाणे त्यांनाही निश्चितपणे होईल.
ई-कॉमर्स कंपनीतील आपला अनुभव सांगताना बेझॉस म्हणाले की, सुरुवातीच्या काळात वस्तूंच्या पॅकिंगपासून त्या वस्तू ग्राहकांना घरी पोहोचविण्यापर्यंतचे काम आपण केले आहे. त्यामुळे ग्राहकांच्या अपेक्षा, मागण्या व पुरवठा करण्यात येणाऱ्या अडचणी, तसेच त्यांचा तत्पर पुरवठा करताना कंपन्यांना येणारे अडथळे याची कल्पना आहे. त्यामुळे या अडचणी भारतात येऊ नयेत, यासाठी अॅमेझॉन पूर्ण तयारी करीत आहे. जेफ बेझॉस यांनी दिल्लीत लहान मुलांसह पतंगही उडविले. त्यावेळी ते भलतेच खुशीत दिसत होते. पतंग उडवितानाचे छायाचित्र त्यांनी स्वत:च इन्स्टाग्रामवर पोस्ट केले. त्यांनी मंगळवारी राजघाटावर जाऊ न महात्मा गांधींच्या समाधीचे दर्शन घेतले आणि त्यांना आदरांजलीही वाहिली.