वॉशिंगटन : भारत सरकारने कडक समज दिल्यानंतर आॅनलाइन विक्री सेवा देणारी कंपनी अॅमेझॉनने भारतीय राष्ट्रध्वजाच्या रंगाच्या पायपुसण्यांची विक्री थांबविली आहे. अॅमेझॉनच्या कॅनडियन वेबसाइटवरून ही पायपुसणी हटविण्यात आली आहेत. अॅमेझॉनच्या सिएटल येथील मुख्यालयातील प्रवक्त्याने वॉशिंग्टन पोस्टला सांगितले की, ही पायपुसणी आता आमच्या वेबसाइटवर विक्रीसाठी उपलब्ध नाहीत. अॅमेझॉनकडून कॅनडात तिरंगा ध्वजाच्या रंगरूपातील पायपुसण्याची विक्री करण्यात येत होती. ही माहिती कळाल्यानंतर भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी काल अॅमेझॉनला कडक शब्दांत समज दिली होती. स्वराज यांनी म्हटले होते की, या उत्पादनाची विक्री ताबडतोब थांबविण्यात यावी, तसेच बिनशर्त माफी मागण्यात यावी, अन्यथा कंपनीच्या अधिकाऱ्यांना कोणत्याही प्रकारचा व्हिसा दिला जाणार नाही. याआधी देण्यात आलेला व्हिसाही रद्द करण्यात येईल. हे प्रकरण अॅमेझॉन कॅनडापर्यंत नेण्याच्या सूचना स्वराज यांनी भारतीय दूतावासाला दिल्या होत्या. सुषमा स्वराज यांनी टिष्ट्वट्सची मालिका जारी करून आपला संताप व्यक्त केला होता. कॅनडातील भारतीय उच्चायुक्तालयाला उद्देशून सुषमा स्वराज यांनी, ‘हे अजिबात स्वीकारार्ह नाही. हा मुद्दा अॅमेझॉनच्या उच्च पातळीवर उपस्थित करा,’ असे एका टिष्ट्वटमध्ये म्हटले होते. दुसऱ्या टिष्ट्वटमध्ये त्यांनी अॅमेझॉनला माफी मागण्यास सांगितले होते. (वृत्तसंस्था)
वादग्रस्त पायपुसण्यांची विक्री अॅमेझॉनने थांबवली
By admin | Published: January 13, 2017 12:34 AM