नवी दिल्ली : देशातील प्रमुख उद्योगपती असलेल्या मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्यामध्ये सध्या गुजरातमध्ये अधिकाधिक गुंतवणूक करण्यावरून स्पर्धा लागली आहे. यात अंबानींचा वरचष्मा दिसत असला तरी अदानी त्यांना मागे टाकू शकतात. रिलायन्सनेगुजरातमध्ये हरित ऊर्जा प्रकल्पांमध्ये ५.९५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली असून, अदानी समूहाने पोलाद प्रकल्प उभारण्यासाठी ५ अब्ज डॉलरचा करार केला आहे.
रिलायन्स गुजरातमध्ये एक लाख मेगावॅट अक्षय ऊर्जा प्रकल्प आणि हरित हायड्रोजन पर्यावरणाच्या विकासासाठी ५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. याशिवाय, कंपनी सौर फोटोव्होल्टेइक मॉड्यूल्स, हायड्रोजन उत्पादनासाठी इलेक्ट्रोलायझर, ऊर्जा साठवण बॅटरीच्या निर्मितीसाठी कारखाने उभारण्यासाठी ६० हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे. त्यासह पुढील तीन ते पाच वर्षांत सध्याचे प्रकल्प आणि नवीन उपक्रमांमध्ये २५ हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे.
अदानींना पोलादात क्षेत्रात उतरणार -
अदानी समूहाने गुजरातमध्ये पोलाद प्रकल्प उभारण्यासाठी दक्षिण कोरियन कंपनी पोस्कोसोबत ३ अब्ज डॉलरचा करार केला आहे. यामुळे अदानी समूहाला पोलाद क्षेत्रात प्रवेश करण्याचा मार्ग मोकळा होईल. रिलायन्सचे पेट्रोकेमिकल हब जामनगर, गुजरात येथे आहे. रिलायन्सच्या जामनगरमध्ये दोन रिफायनरी आहेत. दुसरीकडे, अदानींचा बहुतांश व्यवसाय गुजरातमध्येही पसरलेला आहे. त्यामुळे दोन्ही कंपन्यांनी गुजरातमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे.