लखनऊ: उत्तर प्रदेशातील आंबेडकर महासभा या संघटनेकडून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना दलित मित्र पुरस्कार देण्यात येणार आहे. आंबेडकर महासभेकडून पहिल्यांदाच एखाद्या व्यक्तीला या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. संघटनेचे अध्यक्ष लालजी निर्मल यांनी याविषयी माहिती देताना सांगितले की, या पुरस्कारासाठी योगी आदित्यनाथ यांची निवड करण्यामागे अनेक कारणे आहेत. हे पहिले सरकार आहे की ज्यांनी उत्तर प्रदेशातील प्रत्येक सरकारी कार्यालयात आणि पोलीस ठाण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र लावण्याचा आदेश दिला. तसेच योगी सरकारने विधानसभेत मागासलेल्या घटकांना आरक्षण देण्याचीही घोषणा केली. या सगळ्या गोष्टी ध्यानात घेऊन त्यांना दलित मित्र पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे लालजी निर्मल यांनी सांगितले. मात्र, योगी आदित्यनाथांना हा पुरस्कार देण्याच्या निर्णयावरून विरोधकांकडून टीकाही केली जात आहे. या टीकेला प्रत्युत्तर देताना लालजी निर्मल यांनी सांगितले की, आमच्या संघटनेला कोणतीही राजकीय संघटना निधी पुरवत नाही. त्यामुळे हे सर्व आरोप राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे लालजी यांनी सांगितले. भाजपा सरकारकडून यंदा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात मोठ्याप्रमाणावर कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. यावेळी भाजपा कार्यकर्त्यांकडून प्रत्येक जिल्ह्यात पदयात्राही काढल्या जाणार आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये दलित अत्याचार तसेच अॅट्रॉसिटी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल आणि त्यानंतर देशभरात उसळलेला हिंसाचार यामुळे भारतीय जनता पक्षातील खासदार स्वत:च्याच पक्षावर नाराज आहेत. या खासदारांची नाराजी भारतीय जनता पक्षासाठी आगामी कर्नाटक विधानसभा निवडणुकीत अडचणीची ठरण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपामधील श्रेष्ठींनी दलित खासदारांची नाराजी दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी दलित खासदारांशी संवाद साधणार आहेत. तसेच त्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी पुढाकार घेणार आहेत.
योगी आदित्यनाथांना मिळणार दलित मित्र पुरस्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2018 8:58 AM