संस्कृत भाषेसंदर्भात समाजामध्ये अनेक गैरसमज आहेत. मात्र भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संस्कृत ही राष्ट्रभाषा व्हावी हा प्रस्ताव संविधान निर्मिती सभेच्या बैठकीत ठेवला होता. मात्र तत्कालिन राजकारणात संस्कृत भाषेचा पराभव झाला. संस्कृतचे वैज्ञानिक महत्त्व लक्षात घेता तिला तळागाळापर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे व त्यासाठी शिक्षणात ही भाषा अनिवार्य करायला हवी, असे मत माजी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ.मुरलीमनोहर जोशी यांनी व्यक्त केले. प्रज्ञाभारती डॉ. श्रीधर भास्कर वर्णेकर जन्मशताब्दी महोत्सव समिती व अभ्यंकर नगर नागरिक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘मानवंदना’ कार्यक्रमादरम्यान मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते.लक्ष्मीनगर येथील सायंटिफि सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरी, समितीचे कार्याध्यक्ष राम खांडवे, अभ्यंकर नगर नागरिक मंडळाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर शेन्द्रे, सचिव रवींद्र कासखेडीकर हे प्रामुख्याने उपस्थित होते. डॉ.आंबेडकरांनी मांडलेल्या प्रस्तावाला मुस्लिम सदस्यांनीदेखील अनुमोदन दिले होते. संस्कृत ब्राम्हणांची भाषा आहे, असे तेव्हा कुणीच म्हटले नव्हते. उलट ती एकतेची भाषा आहे असे अनुमोदन देणाºयांनी म्हटले होते. संस्कृतमध्ये सर्वच विज्ञानांचा समावेश असून केवळ पूजा अर्चनेची ती भाषा नाही. अनेक पाश्चिमात्य संशोधकांनीदेखील संस्कृतचे दाखले दिले आहेत, असे डॉ.जोशी यावेळी म्हणाले.
संस्कृत भाषा अनिवार्य हवीसंस्कृत भाषेचा प्रचार-प्रसार व्हावा यासाठी रालोआच्या कार्यकाळात आम्ही विविध प्रयत्न केले होते. ‘सीबीएसई’शी संबंधित एका प्रकरणात तर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी ‘संस्कृतला शिक्षणात अनिवार्य का करत नाही’ असा प्रश्नच केला होता. संस्कृत भाषेला अनिवार्य करणे ही काळाची आवश्यकता आहे. जोपर्यंत ही बाब क्रियान्वित होत नाही, तोपर्यंत देश वसाहतवादाच्या जोखडातून बाहेर निघणार नाही, असे डॉ.जोशी यांनी प्रतिपादन केले.
संघातील गीते दूरदर्शनवर ?दरम्यान, यावेळी गडकरी यांनी संघातील विविध गीतांवर भाष्य केले. संघातील गाण्यांचे लेखक कोण ते कळत नाही. मात्र याच्या भावार्थात सकारात्मक संदेश असतो. सामाजिक व राष्ट्रीय प्रेरणा देणारी ही गीतं दूरदर्शनच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचावे यासाठी प्रयत्न व्हावेत अशी विनंती केंद्रीय सूचना व प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांना केली आहे अशी माहिती नितीन गडकरी यांनी यावेळी दिली.