कानपूर:उत्तर प्रदेशपोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सने (UPSTF) लखनऊमध्ये छाप्यादरम्यान एम्बरग्रीसची (व्हेल उलटी) तस्करी करणाऱ्या टोळीतील 4 सदस्यांना अटक केली आहे. एसटीएफने आरोपींकडून 4.12 किलो उलटी जप्त केली असून, आंतरराष्ट्रीय बाजारात याची किंमत तब्बल ₹ 10 कोटी रुपये आहे. 1972 वन्यजीव (संरक्षण) कायद्यानुसार व्हेलची उलटी विकण्यावर बंदी आहे.
UPSTF ने या अटकेबाबत ट्विट करुन माहिती दिली. "05.09.2022 रोजी, वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत बंदी घातलेल्या एम्बरग्रीसच्या तस्करीप्रकरणी चार जणांना गोमतीनगर विस्तार क्षेत्र पोलीस स्टेशन, लखनौ येथून अटक केली आहे. त्यांच्याकडून 10 कोटी रुपये किमतीची 4.120 किलोग्रॅम उलटी जप्त करण्यात आली. दरम्यान, स्पर्म व्हेलच्या उलटीला "ग्रे एम्बर" आणि "फ्लोटिंग गोल्ड" देखील म्हणतात. या उलटीचा उपयोग परफ्यूम बनवण्यासाठी केला जातो.
भारतात व्हेल माशाची उलटी विकल्याप्रकरणी अटक होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी अनेकदा बेकायदेशीररीत्या एम्बरग्रीसची विक्री केल्याप्रकरणी अनेकांना ताब्यात घेण्यात आले आहे. या वर्षी जुलैमध्ये, केरळमधील मच्छिमारांच्या एका गटाला 28 कोटी रुपयांची व्हेल उलटी सापडली होती, त्यांनी ती स्वतःहून स्थानिक अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिली. ही बातमी व्हायरल झाल्यानंतर त्या व्यक्तीवर सर्वांकडून कौतुकाचा वर्षाव झाला.
एम्बरग्रीस म्हणजे काय? ते इतके महाग का आहे?एम्बरग्रीस स्पर्म व्हेलच्या पाचन तंत्रात तयार होते. हा एक मेणसारखा, घन, ज्वलनशील पदार्थ आहे, जो व्हेलच्या आतड्यांमध्ये तयार होतो. याचा उपयोग सौंदर्यप्रसाधने आणि औषधांमध्ये वापरला जातो. प्राचीन काळापासून, एम्बरग्रीसचा वापर सुगंध आणि उच्च दर्जाच्या परफ्यूममध्ये तसेच विविध पारंपारिक औषधांमध्ये केला जात आहे. मुंबई पोलिसांनी गेल्या वर्षी दिलेल्या अंदाजानुसार, 1 किलो एम्बरग्रीसची किंमत ₹ 1 कोटींपर्यंत असू शकते.