तामिळनाडूमधील वेल्लोर येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे १८ महिन्यांच्या एका मुलीचा सर्पदंशामुळे मृत्यू झाला. येथे वाहतुकीची पुरेशी सुविधा उपलब्ध नसल्याने या मुलीला वेळीच औषधोपचार मिळू शकले नाहीत. त्यामुळे तिचा मृत्यू झाला. प्रसारमाध्यमांमध्ये येत असलेल्या वृत्तानुसार येथील रस्त्याच्या दुरावस्थेमुळे रुग्णवाहिकाचालक मुलीचा मृतदेह आणि तिच्या आईला वाटेतच सोडून पळून गेला. त्यानंतर सदर महिला मुलीचा मृतदेह घेऊन सुमारे सहा किमी पायी चालत रुग्णालयात पोहोचली. मात्र मुलीचा आधीच मृत्यू झाला होता.
मिळालेल्या माहितीनुसार कुटुंबीयांनी आरोप केला की, रस्ता खराब असल्याने मुलीला वेळीच वैद्यकीय मदत मिळू शकली नाही. त्यामुळे तिचा मृत्यू झाला. तर वेल्लोरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सांगिलते की, जर त्यांनी आशा कार्यकर्त्यांशी संपर्क साधला असता तर त्यांच्यापर्यंत मदत पोहोचली असती. जिल्हाधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की. तिथे एक मिनी अॅम्ब्युलन्स होती. मात्र त्यांनी आशा कार्यकर्त्यांशी संपर्क साधला पाहिजे होता. त्यांनी असं केलं नाही. ते मुलीला दुचाकीवरून घेऊन गेले.
जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, १५०० लोकसंख्या असलेल्या भागात आधीपासून रस्ता बनवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. वनविभागालाही क्लिअरन्ससाठी अर्ज पाठवण्यात आला आहे.