राजस्थानमधील बांसवाडा जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका आजारी रुग्णाला जिल्हा रुग्णालयात नेणाऱ्या रुग्णवाहिकेतील डिझेल रस्त्यातच संपल्याची घटना समोर आली आहे. त्यानंतर रुग्णाचे नातेवाईक बाईकने डिझेल घेऊन मदतीसाठी तेथे पोहोचले. मात्र रुग्णवाहिका सुरू झाली नाही. रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णवाहिका सुरू करण्यासाठी 1 किलोमीटर धक्का मारला. हतबल कुटुंबाने रुग्णवाहिका चालकाकडे मदतीसाठी हात पसरले आणि दुसरी रुग्णवाहिका बोलवण्यास सांगितले. त्यानंतर 40 मिनिटांनी दुसरी रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली.
दुसरी रुग्णवाहिका रुग्णाला घेऊन रुग्णालयात पोहोचली मात्र तोपर्यंत रुग्णाने आपला जीव सोडला होता. रुग्णालयातील डॉक्टरांनी रुग्णाला मृत घोषित केले. मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानमधील भीषण वैद्यकीय व्यवस्था दाखवणारे हे प्रकरण दोन दिवसांपूर्वी घडले आहे. बांसवाड्याला लागून असलेल्या प्रतापगड जिल्ह्यातील सेलिया भागातील सूरजपुरा येथील तेजपाल गणवा (40) हे आपल्या मुलीच्या सासरी भानुपारा (घोडी तेजपूर) येथे आले होते. सुमारे तीन दिवस ते मुलगी आणि नातवासोबत येथे राहिले. दरम्यान, 23 नोव्हेंबर रोजी तेजपाल शेतात उभे असताना खाली पडले. तेजपाल यांच्या मुलीने पती मुकेश मैदा यांना याबाबत माहिती दिली.
तासाभरानंतर आली पहिली रुग्णवाहिका
रुग्णवाहिकेसाठी प्रथम त्यांनी 108 क्रमांकावर कॉल केला आणि स्वत: बाईक घेऊन घराकडे निघाले. सकाळी 11 वाजता घडलेल्या या घटनेची माहिती मिळताच मुकेश 12 वाजता त्याच्या गावी पोहोचले होते. पण तासाभरानंतर रुग्णवाहिका आली. रुग्णवाहिका प्रथम घोरी तेजपूर PHC येथे पोहोचली. तेथे ईसीजी मशीन नसल्याचे कारण देत कर्मचाऱ्यांनी रुग्णाच्या नातेवाइकांना छोटी सरवण सीएचसीमध्ये जाण्यास सांगितले. मात्र कुटुंबीयांनी रुग्णाला थेट जिल्हा रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेतला. रतलाम रोडवरील टोलनाक्यासमोर संपले डिझेल
रुग्णाला घेऊन रतलाम रोडवरील टोलनाक्यासमोर रुग्णवाहिका पोहोचली आणि बंद झाली. डिझेल संपल्याच समजलं. रुग्णवाहिकेच्या चालकाने बाईकवरून डिझेल आणण्यासाठी रुग्णाच्या नातेवाईकाला 500 रुपये दिले. डिझेल आणूनही रुग्णवाहिका सुरू झाली नाही. यावर रुग्णाच्या नातेवाईकांनी सुमारे एक किलोमीटरपर्यंत धक्का देऊन रुग्णवाहिका सुरू करण्याचा प्रयत्न केला. यानंतर रुग्णाच्या नातेवाईकांच्या सांगण्यावरून रुग्णवाहिका चालकाने दुसरी रुग्णवाहिका बोलावली. मात्र ती रुग्णाला घेऊन रुग्णालयात पोहोचली तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"