वॉशिंग्टन : पाकिस्तानने दहशतवादाशी लढावे तसेच संयुक्त राष्ट्रांनी दहशतवादी म्हणून घोषित केलेल्या लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहंमद यांसारख्या संघटनांना बेकायदेशीर ठरवावे, अशी भूमिका अमेरिकेने भारताकडे व्यक्त केली आहे. 18 सप्टेंबर रोजी पाक पुरस्कृत अतिरेक्यांनी भारतीय लष्कराच्या उरी येथील ब्रिगेड मुख्यालयावर केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सुझान राईस यांनी काल भारताचे सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याशी बातचीत केली. त्या वेळी राईस यांनी ही भूमिका मांडली. राईस यांनी उरी हल्ल्याचा जोरदार निषेध केला. तसेच भारतीय जवानांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला. अमेरिकी राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे प्रवक्ता नेड प्राईस यांनी ही माहिती दिली. प्राईस यांनी सांगितले की, पाकिस्तानने दहशतवादाशी लढण्यासाठी तसेच लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहंमद यांच्यासह संयुक्त राष्ट्रांनी अतिरेकी घोषित केलेल्या संघटनांची वैधता संपविण्यासाठी पाकिस्तानने प्रभावी कृती करावी, या अमेरिकेच्या भूमिकेचा राईस यांनी पुनरुच्चार केला आहे. राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा प्रशासनातर्फे सुझान राईस यांनी नमूद केले की, जगातील सर्वच ठिकाणच्या अतिरेक्यांचा खातमा करण्यासाठी आपण सर्वशक्तीनिशी प्रयत्न करीत असून, विभागीय शांतता आणि स्थैर्याचा पाठपुरावा करण्यासाठी कटिबद्ध आहोत. याबाबत राईस यांनी भारताशी चर्चा केली. दहशतवादाच्या मुद्द्यावर सहकार्य वाढविण्यावरही त्यांनी भर दिला.उरी हल्ल्यात पाकिस्तानचाच हात असल्याचा आरोप भारताने केला असून, त्याचा बदला म्हणून गुरुवारी पाकिस्तानी हद्दीत घुसून अतिरेकी तळ उद्ध्वस्त केले. भारतातील हल्ल्यांमागे लष्कर-ए-तोयबाचा हात असल्याचा आरोप भारत सातत्याने करीत आहे. जैश-ए-मोहंमदचा म्होरक्या मसूद अझर, लष्कर-ए-तोयबाचा सहसंस्थापक आणि जमात-उद-दावाचा म्होरक्या हाफिज सईद यांच्यावर निर्बंध लादण्याची मागणी भारताने केली आहे. २00८च्या मुंबई हल्ल्यात हाफीज सईदचा हात असल्याचा आरोप असून, त्याच्यावर १0 दशलक्ष डॉलरचे बक्षीस आहे.
अमेरिकेने भारताकडे व्यक्त केली भूमिका
By admin | Published: September 30, 2016 5:17 AM