अमृतसर : अमेरिकेने बुधवारी अवैध प्रवाशांविरुद्धच्या धोरणा अंतर्गत १०४ अवैध भारतीय स्थलांतरितांना जबरदस्तीने त्यांच्या देशातून हाकलून दिले. त्यांना घेऊन जाणारे अमेरिकन हवाई दलाचे विमान सी-१७ ग्लोबमास्टर २ वाजता अमृतसर येथील हवाई दलाच्या हवाई तळावर उतरले. या १०४ लोकांत त्यांची काही कुटुंबे आणि ८-१० वर्षे वयोगटातील मुलांचाही समावेश होता.
अमृतसर विमानतळाच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या लोकांची पडताळणी करण्यात आली. येथून, इमिग्रेशन आणि कस्टम्सकडून मंजुरी मिळाल्यानंतर त्यांना पंजाब पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
अमेरिकन हवाई दलाचे विमान सुमारे साडेतीन तासांनंतर परतले. त्यानंतर पंजाबमधील लोकांना पोलिसांच्या वाहनांमधून त्यांच्या घरी पाठवण्यात आले. मात्र, हरयाणा, गुजरात, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि चंडीगडमधील लोकांचे परतणे अद्याप बाकी आहे.
३० हजार घुसखोरांना एकाच ठिकाणी ठेवणार
अवैध प्रवाशांना मायदेशी पाठविण्यासोबत काही जणांना क्यूबातील ‘ग्वांतानामो बे’ या कारागृहात हलविण्यात येत आहे. अवैध प्रवाशांना निर्वासित करण्यासाठी अमेरिकेचे एक विमान ‘ग्वांतानामो बे’ येथे दाखल झाले.
त्यामुळे अमेरिकन नौदलाचे तळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या ‘ग्वांतानामो बे’मध्ये अवैध प्रवाशांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. अवैध प्रवाशांना ठेवण्यासाठी ही सर्वांत योग्य जागा असून, येथे किमान ३० हजार लोकांना ठेवता येऊ शकते. आकडेवारीनुसार १९ हजार बेकायदेशीर भारतीयांना हद्दपार केले जाईल.