Inder Singh Parmar Statement : अमेरिकेचा शोध कोलंबसने लावला, तर भारताचा सोध वास्को द गामाने लावला, असे इतिहास सांगतो. पण, मध्य प्रदेशचे उच्च शिक्षण मंत्री इंदर सिंह परमार यांनी नवा जावईशोध लावत वेगळेच दावे केले आहेत. वास्को द गामा चंदन नावाच्या भारतीय व्यापाऱ्याचे मागे मागे आलेला, असे ते म्हणाले. त्याचबरोबर अमेरिकेचा शोध भारतीय व्यक्तीने लावला होता, असा दावाही त्यांनी केला. महत्त्वाचे म्हणजे हे सगळे दावे त्यांनी विद्यापीठाच्या पदवी प्रदान समारंभात केले.
मध्य प्रदेशातील बरकतउल्ला विद्यापाठीचा पदवी प्रदान समारंभ राज्यपाल मंगूभाई पटेल आणि मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमाला उच्च शिक्षण मंत्री इंदर सिंह परमारही उपस्थित होते.
इंदर सिंह परमार यांनी विद्यार्थ्यांना कोणता इतिहास सांगितला?
अमेरिकेच्या शोधाबद्दल बोलताना इंदर सिंह परमान म्हणाले, "एक भारतीय नावाडी ८व्य शतकात अमेरिकेत गेला होता. आणि सॅन डिएगोमध्ये त्याने मंदिरे बांधली. हे सगळे तिथल्या संग्रहालयांमध्ये लिहिलेले आहे. जेव्हा आम्ही तिथे गेलो तेव्हा त्यांची संस्कृती माया संस्कृतीनुसार विकसित करण्यास मदत केली."
"माया संस्कृती भारताचा विचार आणि सभ्यतेची पद्धत आहे. त्याबद्दल भारतीय विद्यार्थ्यांना शिकवले पाहिजे. जर काही शिकण्याची गरज असेल, तर ते म्हणजे योग्य पद्धतीने शिकवले गेले पाहिजे की, आपल्या पूर्वजांनी अमेरिकेचा शोध लावला होता, कोलंबसने नाही", असे इंदर सिंह परमार म्हणाले.
"भारताचा शोध वास्को द गामाने लावला नाही"
इंदर सिंह परमार पुढे असेही म्हणाले की, "पोर्तुगालच्या वास्को द गामाने भारताचा शोध लावला नाही. वास्को द गामा चंदन नावाच्या भारतीय व्यापाऱ्याच्या मागे मागे आलेला. व्यापारी चंदन याचे जहाज वास्को द गामाच्या जहाजापेक्षा चारपट मोठे होते. पण, इतिहासकारांनी भारतीयांना चुकीचा इतिहास सांगितला की, वास्को द गामाने भारताचा शोध लावला."
बीजिंग शहराचे डिझाईन भारतीय आर्किटेक्टने केले
इंदर सिंह परमार यांनी बीजिंग शहर वसवण्याबद्दलचाही वेगळा इतिहास सांगितला. परमार म्हणाले, "12 व्या शतकात जेव्हा बीजिंग शहर वसले. तेव्हा त्याचे डिझाईन आणि आर्किटेक्चर एका नेपाळी व्यक्तीने तयार केले. त्यावेळी नेपाळ भारताचा भाग होता", असेही ते म्हणाले.