लखनौ – २००० साली लखनौच्या चारबाग रेल्वे स्टेशनवर एक लहान मुलगी जीआरपीच्या बेवारस अवस्थेत सापडली होती. या मुलीचे ना कोणते कुटुंब होते, ना तिचे नातेवाईक. पोलिसांनी मुलीच्या पालकांना शोधण्याचा बराच प्रयत्न केला परंतु काहीच हाती लागले नाही. अखेर एका अनाथालयात मुलीला पाठवण्यात आले. जिथून एका अमेरिकन महिलेने मुलीला दत्तक घेतले. त्यानंतर ही महिला मुलीला घेऊन सातासमुद्रापार पलीकडे तिच्या देशात परतली.
हळूहळू काळ लोटला, अमेरिकेत मुलगी लहानाची मोठी झाली. दरम्याच्या काळात ज्या महिलेने तिला दत्तक घेतले तिचा मृत्यू झाला. परंतु मुलीला तिने जाता जाता तिच्या जन्माचे रहस्य सांगून गेली. ते ऐकून तिला धक्का बसला. या मुलीला तिचे खरे आई वडील कोण याची उत्सुकता लागून राहिली. त्यानंतर सुरू झाला अशक्य असा शोध प्रवास...आता २ दशकाने ही मुलगी भारतात आली. ही कहाणी आहे राखी नावाच्या मुलीची, जिचे अमेरिकेत महोगनी असं नाव ठेवले होते. ती आता २३ वर्षांची झाली होती. मागील आठवड्यात अमेरिकेच्या मिनेसोटाहून दिल्ली आणि तिथून लखनौला ती पोहचली. ती तिच्या खऱ्या आई वडिलांच्या शोधात इथं आलीय असं सांगते.
महोगनी ही चारबाग स्टेशनवर जाऊन रेल्वे पोलीस अधिकाऱ्यांशी बोलली. त्या अनाथालयातही गेली जिथे अमेरिकन महिलेने तिला दत्तक घेतले. परंतु काही विशेष माहिती मिळाली नाही. अनाथालयात काही दस्तावेज मिळाले परंतु त्यात नातेवाईकांबाबत काही माहिती नव्हती. २३ वर्षापूर्वी बेवारस अवस्थेत ती रेल्वे स्टेशनवर पोलिसांना सापडली होती. महोगनीसोबत तिचा मित्र क्रिस्टोफर अमेरिकेहून लखनौला आला होता. तोदेखील तिची मदत करत होता. महोनगी तिच्या आयुष्यातील या घटना आठवून भावूक होत होती. तिच्या डोळ्यात पाणी होते. हातात लहानपणीचे फोटोग्राफ होते. चारबाग रेल्वे स्टेशनवर ती सापडल्यानंतर पोलिसांनी तिच्या आई वडिलांचा आणि नातेवाईकांचा शोध घेतला परंतु ते सापडले नाहीत.
महोगनी तिच्या लहानपणीचा फोटो पाहते. ज्यात एका फोटोत ती फ्रॉकमध्ये आहे. दुसऱ्या फोटोत ती दत्तक घेतलेल्या महिलेसोबत दिसते. हे दोन्ही फोटो लखनौच्या अनाथालयातील आहेत. ज्यात अनाथलायाचे कर्मचारीही दिसतात. इतक्या मोठ्या शहरात, देशात महोगनीला तिच्या आई वडिलांचा शोध घ्यायचा आहे जी अशक्य गोष्ट आहे. आता तिच्याकडे आणखी काही दिवस आहेत. तिचा व्हिसा संपल्यानंतर तिला परत अमेरिकेला परतावे लागेल. परंतु तोपर्यंत ती शोधमोहिम सुरूच ठेवणार आहे. इतकेच नाही तर व्हिसा संपल्यानंतर ती अमेरिकेला जाऊन पुन्हा भारतात येईल आणि आई वडिलांचा शोध घेईल असं ती म्हणते.