नवी दिल्ली- अमेरिकेच्या तेल कंपन्या भारताला घाणेरडं पेट्रोल निर्यात करत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. अमेरिकेन रिफायनरिज ज्या डर्टी फ्युएलला देशात विकू शकत नाहीत, ते भारतात पाठवलं जातं. खरं तर भारतात प्रदूषणाचा स्तर दिवसेंदिवस वाढत असतानाच हा प्रकार उघडकीस आला आहे. पेट्रोल हे फार स्वस्त असतं आणि कोळश्याहून ते अधिक तेजीनं जळतं. परंतु वातावरणाला तापदायक ठरणारं कार्बनही या डर्टी फ्युएलमध्ये जास्त प्रमाणात असतं.इतकेच नव्हे तर फुप्फुसांना सर्वाधिक नुकसान पोहोचवणा-या सल्फरचंही प्रमाण यात जास्त असतं. अमेरिकेचं हे पेट्रोलियम कोक टार सँड्स क्रूड आणि दुस-या हेवी ऑइल्समधून रिफाइन केल्यानंतरही बॅरलच्या खालीच राहतं. अमेरिकेत या पेट्रोलची विक्री होत नाही. त्यामुळे अमेरिका पेट्रोलची मोठ्या प्रमाणात मागणी असलेल्या देशांना असं पेट्रोल निर्यात करते. भारतही त्यांच्यातीलच फ्युएल आयात करणारा एक मोठा देश आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षी जगभरात पाठवण्यात आलेल्या अमेरिकी पेट्रोलियम कोकचा एक चतुर्थांश भाग भारतात पाठवण्यात आला आहे.2016मध्ये अमेरिकेनं 80 लाख मेट्रिक टनांहून अधिक पेट्रोलियम कोक भारतात पाठवलं आहे. हे प्रमाण 2010च्या तुलनेत 20 टक्के जास्त आहे. या पेट्रोलियम कोकचं प्रमाण एवढं जास्त आहेत की, न्यू यॉर्कमधील अॅम्पायर स्टेट बिल्डिंगलाही 8 वेळा भरता येईल. भारतात निर्यात केलं जाणारं हे निकृष्ट पेट्रोलियम कोक अनेक कारखान्यात आणि संयंत्रांमध्ये वापरलं जातंय. त्यामुळे वायू प्रदूषणातही मोठ्या प्रमाणात वाढ होतेय. जगभरातल्या सर्वाधिक प्रदूषण असणा-या शहरांमध्ये भारतातल्या अनेक शहरांचा समावेश आहे. नवी दिल्लीतल्या अनेक नागरिकांनी वाढत्या प्रदूषणाबाबत चिंता व्यक्त केली आहे. माझं जीवन समाप्त होत असून, माझ्या फुफ्फुसंही निकामी झाली आहेत, असंही विधान 63 वर्षीय बीर यांनी केलं आहे.
अमेरिकन तेल कंपन्या भारताला निर्यात करतात डर्टी फ्युएल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2017 6:06 PM