वॉशिंग्टन - देशात सुरू असलेले शेतकरी आंदोलन आता जागातील चर्चेचा विषय बनले आहे. या प्रकरणावर आता अमेरिकेकडूनही प्रतिक्रिया आली आहे. मोदी सरकारच्या कृषी कायद्यांचे समर्थन करत, कुठलाही वाद अथवा आंदोलनावर दोन्ही पक्षांत चर्चा व्हायला हवी आणि त्यातून समाधान निघायला हवे, असे अमेरिकेच्या स्टेट डिपार्टमेंटने म्हटले आहे.
अमेरिकेच्या स्टेट डिपार्टमेंटने भारत सरकारच्या तीनही नव्या कृषी कायद्यांना समर्थन दर्शवले आहे. तसेच, यामुळे भारतीय बाजाराची उपयोगिता वाढेल. कृषी क्षेत्राला अधिक चांगले करण्यासाठी कुठल्याही निर्णयाचे अमेरिका स्वागत करते आणि खासगी क्षेत्रालाही याकडे आणण्याचे स्वागत आहे, असे म्हटले आहे.याच बरोबर, शांततामय पद्धतीने सुरू असलेले आंदोलन हे लोकशाहीचा भाग आहे. भारताच्या सर्वोच्च न्यायालयानेही हेच म्हटले आहे. जर दोन्ही पक्षांत काही मतभेद असतील, तर ते चर्चेतून सोडवायला हवेत, असेही अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने म्हटले आहे. म्हत्वाचे म्हणजे जो बायडेन प्रशासनाकडून पहिल्यांदाच भारतात सुरू असलेल्या आंदोलनावर थेट प्रतिक्रिया देण्यात आली आहे. कुठल्याही प्रकारची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी इंटरनेटचाही वापर केला जातो. यामुळे तो एक चांगल्या लोकशाहीचा भाग आहे, असेही अमेरिकेने म्हटले आहे. दिल्लीच्या सीमावर्ती भागात इंटरनेट सुविधा बंद करण्यात आली आहे. दिल्लीच्या टिकरी, सिंघू आणि गाझीपूर बॉर्डरवर येथे शेतकरी आंदोलन सुरू आहे. या भागात इंटरनेट बॅन आहे. तसेच हरियाणातील काही जिल्ह्यांतही इंटरनेट सुविधा बंद करण्यात आली आहे.
भारताकडून परदेशातील हस्तक्षेपाचा विरोध -भारतीय परराष्ट्रमंत्रालयाने आधीच म्हटले आहे, की शेतकऱ्यांची समस्या हा भारताचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यामुळे कुठल्याही बाहेरील व्यक्ती अथवा संस्थेने यावर प्रतिक्रिया देणे योग्य नाही.
अमेरिकन पॉपस्टार रिहाना आणि इतर जागतीक सेलेब्रिटीजकजून या मुद्यावर प्रतिक्रिया आल्याने बराच वाद झाला आहे. यानंतर आता अमेरिकेकडूनही प्रतिक्रिया आली आहे. त्यामुळे आता अमेरिकेच्या या प्रतिक्रियेवर भारत काय भूमिका घेतो, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
भारतीय क्रिकेटर्सनी परदेशी सेलिब्रेटींना फटकारले -यासंदर्भात पॉपस्टार रिहाना, मिया खलीफा (आधीची पोर्न स्टार) आणि ग्रेटा थनबर्ग आदींनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत मोदी सरकारवर टीका केली आहे. यानंतर आता माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरपासून ते अनिल कुंबळेपर्यंत आणि विराट कोहलीपासून ते शिखर धवनपर्यंत आदिंनी सरकारच्या बाजूने उभे राहत शेतकरी आंदोलनावरून सरकारवर टीका करणाऱ्या परदेशी सेलिब्रेटींना फटकारले आहे.