राहुल गांधींच्या 'त्या' वक्तव्यावर अमेरिकेची रिअॅक्शन, मोदींच्या परराष्ट्र धोरणावर साधला होता निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2022 10:23 AM2022-02-03T10:23:01+5:302022-02-03T10:25:11+5:30
"1963 मध्ये पाकिस्तानने बेकायदेशीरपणे शक्सगाम खोरे चीनला देवून टाकले. एवढेच नाही तर चीनने 1970 च्या दशकात पीओकेमधून काराकोरम हायवे बनवला होता. 1970 पासून दोन्ही देशांमध्ये घनिष्ठ अण्वस्त्र सहकार्य होते. 2013 मध्ये चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर सुरू झाला."
काँग्रेस नेते तथा खासदार राहुल गांधी यांनी बुधवारी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावादरम्यान केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर हल्ला चढवला आणि अनेक गंभीर आरोप केले. यावेळी राहुल म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अप्रभावी धोरणांमुळे चीन आणि पाकिस्तान पूर्वीच्या तुलनेत अधिक जवळ आले आहेत. त्यांच्या या वक्तव्यावर यूएस डिपार्टमेंट ऑफ स्टेट स्पोक्स नेड प्राइस म्हणाले, ''मी ते पाकिस्तानी आणि पीआरसीवर त्यांच्या संबंधांसंदर्भात बोलण्यासाठी सोडेन. मी नक्कीच त्या टिप्पण्यांचे समर्थन करणार नाही.''
To a question on Congress leader Rahul Gandhi 'suggesting that China & Pakistan are closer than ever due to PM Modi's ineffective policies', US Dept of State Spox Ned Price: I'll leave it to Pakistanis & PRC to speak to their relationship. I certainly won't endorse those remarks. pic.twitter.com/ooSmjJhIPU
— ANI (@ANI) February 3, 2022
राहुल गांधींच्या आरोपांवर जयशंकर यांचाही पलटवार -
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी लोकसभेत सरकारवर केलेल्या आरोपांना परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी उत्तर दिले. परराष्ट्र मंत्री ट्विट करत म्हणाले, "राहुल गांधी लोकसभेत बोलताना म्हणाले, सध्या प्रजासत्ताक दिनी आपल्याला परदेशी पाहुणा मिळू शकत नाही. देशातील जनतेला हे माहित आहे की, आपण कोरोनाच्या नव्या लाटेचा सामना करत आहोत. पाच मध्य आशियाई देशांचे राष्ट्रपती आपल्या देशात येणार होते. परंतु कोरोना संकटामुळे त्यांनी 27 जानेवारी रोजी व्हर्च्युअल माध्यमाने शिखर परिषदेला हजेरी लावली. लोकसभेत राहुल गांधी या गोष्टी विसरले का?
जयशंकर पुढे म्हणाले, राहुल गांधी यांनी लोकसभेत आरोप केला की, या सरकारने पाकिस्तान आणि चीनला एकत्र आणण्याचे काम केले. काँग्रेस नेत्याला (राहुल गांधींना) या घटना माहीत असायला हव्यात की, 1963 मध्ये पाकिस्तानने बेकायदेशीरपणे शक्सगाम खोरे चीनला देवून टाकले. एवढेच नाही तर चीनने 1970 च्या दशकात पीओकेमधून काराकोरम हायवे बनवला होता. चीन आणि पाकिस्तानची मैत्री काही नवीन नाही. 1970 पासून दोन्ही देशांमध्ये घनिष्ठ अण्वस्त्र सहकार्य होते. 2013 मध्ये चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर सुरू झाला. त्यामुळे राहुल गांधी यांनी स्वतःलाच विचारायला हवे की, तेव्हा चीन आणि पाकिस्तान दूर होते? असेही ते म्हणाले.