अमेठी : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. उत्तर प्रदेशातील हायप्रोफाईल अमेठी लोकसभा मतदारसंघात निवडणुकीपूर्वीच राजकीय वातावरण तापले आहे. अमेठीमध्ये 20 मे रोजी पाचव्या टप्प्यात मतदान होणार आहे, मात्र त्याआधी पोस्टर वॉरही सुरू झाले आहे.
रॉबर्ट वाड्रा यांनी निवडणूक लढवावी, अशी मागणी करणारे पोस्टर अमेठी आणि गौरीगंजमधील काँग्रेस कार्यालयासह इतर ठिकाणी लावण्यात आले आहेत. तसेच, पोस्टरमध्ये लिहिले आहे की, "अमेठी की जनता करें पुकार, रॉबर्ट वाड्रा अबकी बार', निवेदक अमेठी की जनता."
दरम्यान, अमेठीतून रॉबर्ट वाड्रा यांनी निवडणूक लढवण्याची मागणी जोर धरू लागली आहे. तसेच, गेल्या काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर काही फोटो व्हायरल झाले होते, ज्यामध्ये रॉबर्ट वाड्रा यांना अमेठीतून निवडणूक लढवण्याची मागणी करण्यात आली होती.
आता अमेठीत पोस्टर लावून रॉबर्ट वाड्रा यांनी निवडणूक लढवावी, अशी मागणी करण्यात आली आहे. अमेठी आणि गौरीगंज येथील काँग्रेस कार्यालय, हनुमान तिराहा, रेल्वे स्टेशन रोड आणि रेल्वे स्टेशनसह इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोस्टर लावण्यात आले आहेत.
दुसरीकडे, रॉबर्ट वाड्रा यांनी यावेळी अमेठीतून निवडणूक लढवावी, अशी अमेठीच्या जनतेची मागणी आहे. राहुल गांधी वायनाडमधून निवडणूक लढवत आहेत, त्यामुळे त्यांनी अमेठीतून निवडणूक लढवू नये, असे पोस्टरबाबत काँग्रेसच्या माजी युवा जिल्हाध्यक्ष सोनू सिंह रघुवंशी म्हणाले.
याचबरोबर, रॉबर्ट वाड्रा अमेठीतून, तर प्रियंका गांधी रायबरेलीतून निवडणूक लढवणार आहेत. यावेळी काँग्रेस मोठ्या फरकाने निवडणूक जिंकेल आणि केंद्रीय मंत्री आणि विद्यमान खासदार स्मृती इराणी निवडणुकीत पराभूत होतील, असा विश्वासही सोनू सिंह रघुवंशी यांनी सांगितले.