Amethi Loksabha Election : लोकसभा निवडणुकीसाठी सगळ्याच पक्षांनी आपली संपूर्ण ताकद पणाला लावलीय. मात्र आता विरोधी पक्षातील काँग्रेसमध्ये या निवडणुकीवरुन गृहयुद्ध सुरुय का अशी चर्चा सुरु झालीय. काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या अमेठी आणि रायबरेली या जागांसाठी उमेदवारांच्या घोषणा करण्यात बराच वेळ गेला. राहुल गांधींना अमेठीऐवजी सोनिया गांधी यांची रायबरेलीची जागा दिली आहे. तर अमेठीमधून काँग्रेसने किशोरीलाल शर्मा यांना उमेदवारी देण्यात आलीय. मात्र आता अमेठीतून तिकीट न मिळाल्याने प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ड वाड्रा हे नाराज असल्याचे म्हटलं जात होतं. पण आता वाड्रा यांनी स्वतः फेसबुक पोस्टच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
निवडणुकीच्या सुरुवातीपासूनच सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ड वाड्रा हे काँग्रेसच्या तिकीटावर उभं राहण्याची चर्चा होती. काँग्रेसने अमेठी आणि रायबरेलीमधून उमेदवारीचा सस्पेंन्सही कायम ठेवला होता. मात्र राहुल गांधी यांना रायबरेली तर काँग्रेस परिवाराच्या जवळचे किशोरीलाल शर्मा यांना अमेठीमधून उमेदवारी देण्यात आली. अमेठीत काँग्रेसने दिलेल्या उमेदवाराने अनेकांना धक्का बसला आहे. दुसरीकडे रॉबर्ट वाड्रा यांनी फेसबुकवर एक भावनिक पोस्ट केली आहे.
रॉबर्ट वाड्रा यांनी अनेकदा अमेठीतून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र अमेठीतून उमेदवार जाहीर झाल्यानंतर रॉबर्ट वाड्रा यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. "राजकारणाची कोणतीही ताकद किंवा पद आमच्या कुटुंबाच्या मध्ये येऊ शकत नाही. आम्ही सर्वजण आपल्या महान राष्ट्राच्या लोकांच्या आणि लोकांच्या भल्यासाठी नेहमीच काम करू आणि करत राहू. तुमच्या पाठिंब्याबद्दल आणि शुभेच्छांसाठी सर्वांचे आभार. माझ्या सार्वजनिक सेवेतून मी नेहमी जास्तीत जास्त लोकांना मदत करेन," असे वाड्रा यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.
दुसरीकडे, काही दिवसांपूर्वीच वाड्रा यांना तुम्ही अमेठीतून निवडणूक लढवणार आहात का? असं विचारण्यात आलं होतं. त्यावर उत्तर देताना वाड्रा म्हणाले की, 'मी सक्रिय राजकारणात यावे, असा आवाज देशभरातून येत आहेत. मी नेहमीच लोकांमध्ये असतो. अमेठीच्या विद्यमान खासदार स्मृती इराणी यांनी आपली आश्वासने पूर्ण केली नाहीत. तेथील लोकांना मी त्यांच्यामध्ये राहावे असे वाटते.'
दरम्यान, ऑल इंडिया काँग्रेस कमिटीने शुक्रवारी किशोरीलाल शर्मा यांना अमेठीतून उमेदवारी जाहीर केल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं. किशोरीलाल शर्मा हे गांधी घराण्याचे जुने जवळचे मित्र आहेत. रायबरेलीमध्ये ते दीर्घकाळ सोनिया गांधींचे प्रतिनिधीही आहेत. जेव्हा जेव्हा गांधी घराण्याशी संबंधित बाबींचा विचार केला जातो तेव्हा किशोरी लाल शर्मा हे रायबरेली आणि अमेठीमधील सर्वात महत्त्वाच्या व्यक्ती असतात.