प्रबळ इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या जोरावर अनेक अशक्य वाटणाऱ्या गोष्टी देखील सहज शक्य करता येतात. अशीच प्रेरणादायी घटना समोर आली आहे. सैन्यात रुजू होऊन दुर्गेशने केवळ आपल्या कुटुंबाचं नव्हे तर संपूर्ण गावाचं नाव मोठं केलं आहे. कठोर परिश्रमाने त्याने घवघवीत यश मिळवलं आहे. सर्वांना दुर्गेशचा अभिमान वाटत आहे.
दुर्गेशचे वडील अर्जुन कुमार हे अत्यंत गरीब असून त्यांनी मनरेगामध्ये मजुरीचे काम करून आपल्या मुलाला शिक्षण दिलं आहे. आज त्यांच्या मुलाने त्यांचा सन्मान वाढवला आहे. आपल्या मुलाला लष्कराच्या वर्दीत पाहून त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. दुर्गेश कुमार हा गावातील पहिला तरुण आहे ज्याने सैन्यामध्ये यश मिळवलं आहे.
आपल्या वडिलांचा संघर्ष आणि स्वतःची मेहनत या दोन्ही गोष्टींची सांगड घालून यश मिळवणारा तरुण दुर्गेश कुमार अमेठी जिल्ह्यातील गौरीगंज तहसीलमधील पुरा प्रेम पहारगंज गावचा रहिवासी आहे. दुर्गेशने बारावीपर्यंत शिक्षण घेतलं आहे. यानंतर त्याने देशसेवेत सैन्यात भरती होण्यासाठी कठोर परिश्रम सुरू केले. दुर्गेश अनेकवेळा अपयशी ठरला, पण त्याने मेहनत आणि संघर्ष कमी केला नाही. दुर्गेशची नियुक्ती हिमाचल प्रदेशात करण्यात आली आहे.
दुर्गेशने सांगितले की, मला खूप मेहनत करून हे यश मिळालं आहे. माझ्याकडे संसाधनांची कमतरता होती. पहाटे चार वाजता उठून धावायला जायचो. पेपर सुरू असताना इतरांकडून पुस्तकं मागून मी अभ्यास केला आहे. प्रशिक्षण देखील खूप कठीण होते. यादरम्यान अनेक सहकाऱ्यांनी मला प्रशिक्षण सोडण्यास सांगितले होते, मात्र मी प्रशिक्षण सोडले नाही. माझ्या घरची परिस्थिती चांगली नव्हती. मला देशसेवा करायची होती. कोणत्याही कामासाठी मागे हटू नये, हा संदेश मला सर्वांना द्यायचा आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.