कोरोना संकटात मुख्यमंत्र्यांचा अनोखा विक्रम; काँग्रेस खासदारानं खोचकपणे केलं अभिनंदन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2020 05:25 PM2020-04-17T17:25:58+5:302020-04-17T17:30:14+5:30
coronavirus कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचा विक्रम मोडीत
भोपाळ: गेल्या महिन्यात घडलेल्या मोठ्या नाट्यमय घडामोडींनंतर मध्य प्रदेशात भाजपाला सत्ता मिळाली. काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर २० पेक्षा अधिक आमदारांनी राजीनामे दिले. त्यामुळे काँग्रेस सरकार कोसळलं. यानंतर पुन्हा एकदा भाजपा नेते शिवराजसिंह चौहान यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र अद्याप एकाही आमदारानं मंत्रिपदाची शपथ न घेतल्यानं चौहान सध्या एकटेच राज्याचा गाडा हाकत आहेत.
काँग्रेसचा हात सोडून कमळ हाती घेणाऱ्या ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काही दिवसांपूर्वीच गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली. काँग्रेस सरकारमध्ये मंत्री असलेल्या आणि राजीनामा देऊन पक्षातून बाहेर पडलेल्या सहा जणांना मंत्री करण्यात यावं, अशी मागणी सिंधिया यांनी शहा यांच्याकडे केल्याचं समजतं. यावरुन अद्याप तरी कोणताही तोडगा निघाला नसल्याचं दिसतं आहे. त्यामुळे चौहान कॅबिनेटशिवाय २५ दिवस मुख्यमंत्री म्हणून काम करत आहेत. त्यांच्या नावावर एक अनोखा विक्रमदेखील जमा झाला आहे.
कोरोनाचं संकट असल्यानं गेल्या महिन्यात अतिशय साधेपणानं चौहान यांचा शपथविधी संपन्न झाला. २३ मार्चला त्यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र अद्याप तरी त्यांचं मंत्रिमंडळ अस्तित्वात आलेलं नाही. गेल्या २५ दिवसांपासून ते एकटेच राज्यशकट हाकत आहेत. आधी हा विक्रम कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्या नावावर होता. त्यांनी कॅबिनेटशिवाय २४ दिवस राज्य कारभार केला होता. आता चौहान यांनी त्यांचा विक्रम मोडला आहे.
काँग्रेसचे राज्यसभा सदस्य विवेक तनखा यांनी यावर भाष्य करणारं एक ट्विट केलं आहे. 'अभिनंदन शिवराजजी. मध्य प्रदेशात अंधकारमय स्थिती असताना तुम्ही कॅबिनेटशिवाय सर्वाधिकत दिवस मुख्यमंत्री म्हणून राहण्याचा विक्रम केला आहे. याआधी हा विक्रम कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्या नावे होता. तुम्हा दोघांना दलबदलूंमुळे चौथ्यांदा मुख्यमंत्री होता आलं,' असा खोचक टोला तनखा यांनी लगावला आहे.