असानी चक्रीवादळादरम्यान समुद्रात अचानकपणे 'सोन्याचा रथ' दिसून आला आहे. आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्यातील सुन्नापल्ली सी हार्बरमध्ये मंगळवारी हा सोनेरी रंगाचा रहस्यमयी रथ दिसून आला. हा रथ पाहून सर्वानाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, या व्हिडिओमध्ये समुद्र किनाऱ्यावरील लोक हा रथ पाण्यातून ओढून किनाऱ्यावर आणताना दिसत आहेत. श्रीकाकुलम जिल्ह्यातील नौपाडाच्या उपनिरीक्षकाने दिलेल्या माहितीनुसार, या घटनेची माहिती गुप्तचर विभागाला देण्यात आली आहे. एस आय म्हणाले, हा रथ दुसऱ्या एखाद्या देशातूनही वाहून आलेला असू शकतो. यासंदर्भात आम्ही गुप्तचर विभागाला आणि संबंधित अधिकाऱ्यांना माहिती दिली आहे."
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, असानी चक्रीवादळात बुधवारी आंध्र प्रदेशच्या उत्तर किनारपट्टीकडे सरकले. राज्यातील नरसापूरमध्ये 34 किमी आतपर्यंत याचा प्रभाव दिसून आला. यावेळी जवळपास 85 किमी प्रतितास वेगाने वारे वाहत होते. याचवेळी या परिसरात मुसळधार पाऊसही झाला.
दिलासादायक गोष्ट म्हणजे, हे चक्रीवादळ किनारपट्टीपासून दूर जाण्याची आणि गुरुवारपर्यंत कमकुवत होण्याची शक्यताही हवामान खात्याने वर्तवली आहे. तत्पूर्वी, हवामान विभागाने मच्छिमारांना गुरुवारपर्यंत खोल समुद्रात न जाण्याचा सल्ला दिला आहे. तसेच रेल्वेने चक्रिवादळामुळे आपल्या अधिकाऱ्यांना हाय अलर्टवर ठेवले आहे.