बंगळुरू- राफेल विमान प्रकरणावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप होत असतात. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीही राफेल विमान करारावरून मोदींना लक्ष्य करण्याची एकही संधी सोडत नाहीत. फ्रान्सबरोबर 36 लढाऊ विमान खरेदीचा करार करण्यात आला होता, त्यातील दोन विमानं भारतातल्या बंगळुरू विमानतळावर उतरली आहेत. ही दोन्ही विमानं एयरो इंडिया या प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी भारतात दाखल झाली आहेत. या प्रदर्शनात एकूण तीन राफेल विमानं सहभाग घेणार आहेत.भारतात पोहोचलेले राफेल विमान हे फ्रान्सच्या हवाई दलातील आहेत. एअरो इंडियाचं प्रदर्शन 20 ते 24 फेब्रुवारीदरम्यान बंगळुरूत आयोजित करण्यात आलं आहे. या प्रदर्शनात जवळपास 57 एअरक्राफ्ट सहभागी होणार आहेत. त्यासाठी फ्रान्सच्या हवाई दलानं तीन राफेल विमानं भारतात पाठवली आहेत. यातील दोन विमानं बुधवारी भारतात पोहोचली असून, तर तिसरं विमान प्रदर्शनाच्या दिवशी पोहोचणार आहे. हवाई दलाचे डिप्टी चीफ एअर मार्शल विवेक चौधरीसुद्धा राफेलची विमानं उडवणार आहेत. दरम्यान, भारतीय हवाईदलासाठी दस्सॉल्ट या फ्रेंच कंपनीकडून 36 राफेल लढाऊ विमाने खरेदी करण्याचा फ्रेंच सरकारशी करार झाला आहे. हा सौदा मोदी सरकारने फ्रान्सच्या सरकारशी आरंभी केला तेव्हा त्यात कुणीही मध्यस्थ नव्हता. त्या वेळी ही विमाने देशाला प्रत्येकी 500 कोटी रुपयांना मिळणार होती.
VIDEO- वादग्रस्त राफेल विमानांचे अखेर 'भारतात लँडिंग'
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2019 10:14 PM