बीजिंग: लडाखमधील तणाव पूर्णपणे निवळला नसताना आता चीननं हिंदी महासागरात कुरघोड्या करण्यास सुरुवात केली आहे. समुद्रातील हालचालींवर नजर ठेवण्यासाठी चिनी नौदलानं सी विंग ग्लायडर तैनात केले आहेत. टेहळणी करण्याच्या उद्देशानं चीननं तैनात केलेले अंडरवॉटर ड्रोन अनेक महिने पाण्यात राहू शकतात. फोर्ब्समध्ये प्रसिद्ध झालेल्या एका लेखात सुरक्षा विश्लेषक एच. आय. सटन यांनी हा दावा केला आहे.चीननं समुद्रात सोडलेली ग्लायडर्स अनक्रूड अंडरवॉटर व्हिईकल (यूयूव्ही) प्रकारातील आहेत. डिसेंबर २०१९ मध्ये ही ग्लायडर्स लॉन्च करण्यात आली होती. लॉन्च करण्यात आलेली ग्लायडर्स ज्यावेळी पाण्यातून बाहेर काढण्यात आली, त्यावेळी त्यांनी ३ हजार ४०० हून अधिक निरीक्षणं नोंदवली होती. चीननं मोठ्या प्रमाणात अंडरवॉटर ड्रोन्स तैनात केले असल्याची माहिती फोर्ब्सनं दिली आहे.चीन सध्या वापरत असलेल्या ग्लायडरचा वापर याआधी अमेरिकेनं केला आहे. अमेरिकेनं चीनविरोधात ग्लायडर्स वापरून टेहळणीचा प्रयत्न केला होता. चीननं २०१६ मध्ये अमेरिकेची ग्लायडर्स जप्त केली. चीनकडून यूयूव्हीचा सुरू असलेला वापर चिंताजनक असल्याची माहिती सरकारी सुत्रांनी दिली. चीननं हिंदी महासागरात मोठ्या संख्येनं यूयूव्ही उतरवले आहेत. त्यामुळे भारताला असलेला धोका वाढला आहे. पाण्याखाली जाणाऱ्या ग्लायडरमुळे चीनला अतिशय महत्त्वाची माहिती मिळते. ग्लायडरला टर्बुलेंस मीटर, टर्बिडिमीटर, क्लोरोफिल सेन्सर, डिझॉल्ड ऑक्सिजन सेन्सर, नायट्रेटआणि इतर बायोकैमिकल सेन्सर यांच्याशिवाय कंडक्टिविटी, टेम्परेचर, डेप्थ सेन्सर लावलेली असतात. ग्लायडरच्या माध्यमातून मिळणाऱ्या माहितीचा वापर मुख्यत: नौदलाकडून करण्यात येतो.
भारताविरोधात आता चीनच्या पाण्याखालून कुरघोड्या; समोर आला महत्त्वाचा पुरावा
By कुणाल गवाणकर | Published: December 31, 2020 5:20 PM