नवी दिल्ली - काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress Rahul Gandhi) हे विविध मुद्द्यांवरून भाजपा (BJP) आणि मोदी सरकारवर (Modi Government) हल्लाबोल करत असतात. आता पुन्हा एकदा राहुल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार निशाणा साधला आहे. "भारतात आज पंतप्रधान नसून एक असा राजा आहे, ज्याला वाटतं की तो निर्णय घेत असताना लोकांनी शांत बसावं" असं म्हणत टीकास्त्र सोडलं आहे. तसेच पंतप्रधान मोदींवर कोरोनाच्या संकटात शेतकऱ्यांना एक वर्षभर रस्त्यावर सोडल्याचा गंभीर आरोपही केला आणि काँग्रेस असं कधीच करणार नाही, असं देखील म्हणालेआहे.
राहुल गांधी यांनी उधम सिंग नगरमधील किच्छा येथे उत्तराखंडी किसान स्वाभिमान संवाद या रॅलीला संबोधित केले. यावेळी त्यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. मोदी सरकारने जशी वागणूक दिली तसा त्यांचा पक्ष शेतकर्यांशी कधीही वागणार नाही, असं राहुल गांधी म्हणाले. "काँग्रेस सत्तेत असताना शेतकर्यांसाठी कधीही आपले दरवाजे बंद करणार नाही. आम्हाला शेतकरी, गरीब आणि मजूर यांच्यासोबत भागीदारी करून काम करायचे आहे जेणेकरून प्रत्येक विभागाला वाटावं की हे त्यांचे सरकार आहे" असं म्हणत सरकारला कृषी कायदे मागे घेण्यास भाग पाडणाऱ्या शेतकऱ्यांचे त्यांनी अभिनंदन केले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
"एका देशात दोन नवे देश तयार करताहेत, भाजपाला खरा हिंदुस्थान दाखवू"
"भाजपाला खरा हिंदुस्थान दाखवू" असं म्हणत निशाणा साधला आहे. रायपूरमध्ये राहुल गांधी यांनी "धोका कोणत्या गोष्टीचा आहे? सर्वात पहिला भयंकर धोका म्हणजे भाजपा आज एक देश दोन देशांमध्ये विभागत आहे. दोन नवे देश बनवले जात आहेत. एक देश निवडक करोडपतींचा. त्या देशात विमाने, अद्ययावत तंत्रज्ञान, स्टॉक मार्केटचा पैसा आहे. त्या देशात जेवढी देशाची संपत्ती तुम्हाला हवी, तुम्ही घेऊ शकता. दुसरा देश आपल्या प्रिय देशवासीयांचा, कोट्यवधींचा देश" असं म्हटलं आहे. "70 वर्षांत काय झालं? असा प्रश्न तुम्ही उपस्थित करता, तेव्हा तुम्ही काँग्रेसचा नाही तर हा देश घडवणाऱ्या गरीबांचा, शेतकऱ्यांचा, त्यांच्या आई-वडिलांचा अपमान करता" असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. तसेच राहुल गांधी यांनी यावेळी भाजपा भारतात दोन देश करू पाहात आहे, या आपल्या विधानाचा देखील पुनरुच्चार केला.
"देशातल्या गरीबांचा, शेतकऱ्यांचा, त्यांच्या आई-वडिलांचा अपमान करता"
"एक श्रीमंत देश शे-पाचशे लोकांचा आणि दुसरा देश भारतातल्या कोट्यवधी नागरिकांचा. त्यांना वाटतं दोन देश बनवल्यामुळे गरीबांचा देश शांत बसून राहील. गरिबांमध्ये शक्ती नाही. भारतातला गरीब घाबरतो. पण हिंदुस्थानमधला गरीब घाबरत नाही" असं देखील ऱाहुल यांनी म्हटलं आहे. "जर या देशाला कुणी इथपर्यंत पोहोचवलंय, देशात प्रगती झाली आहे, तर ती कुठल्या पक्षामुळे झालेली नाही. ती भारतातल्या गरीबांनी घडवून आणली आहे. जेव्हा तुम्ही म्हणता 70 वर्षांत काय झालं? तेव्हा हे काँग्रेस पक्षाचा अपमान करत नाहीत, ते देशातल्या गरीबांचा, शेतकऱ्यांचा, त्यांच्या आई-वडिलांचा अपमान करत आहेत" अशा शब्दांत राहुल गांधी यांनी टीकास्त्र सोडलं आहे.