कोईम्बतूर - तामिळनाडूतील एका आमदाराच्या घरी लग्नाची जल्लोषात तयारी सुरू असतानाच नवरी पळाल्याची घटना घडली. विशेष म्हणजे या लग्नसोहळ्यासाठीतामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनाही आमंत्रण देण्यात आले होते. भवानीसागर विधानसभा क्षेत्राचे आमदार एस. ईश्वरन यांचे 12 सप्टेंबर रोजी लग्न होणार होते. मात्र, तत्पूर्वी नवरी पळून गेल्याने त्यांच्या विधानसभा परिसरात खळबळ उडाली आहे.
येथील भवानीसागर विधानसभा क्षेत्राचे एडीएमके पक्षाचे आमदार एस. ईश्वरन यांचे वय 43 वर्षे असून त्यांच्या भावी वधुचे वय 23 वर्षे आहे. त्यामुळेच मुलीला ईश्वरन यांचे स्थळ पसंत नव्हते, त्यातूनच नवरी मुलीने धूम ठोकल्याची चर्चा मतदारसंघात होत आहे. केवळ 10 दिवसांवर लग्न येऊन ठेपल्याने दोन्ही घरांमध्ये लग्नाची जय्यत तयारी सुरू होती. आमदार नवरा मुलाकडे आणि नवरी मुलीकडेही लग्नासाठी वर्दळ सुरू झाली होती. मात्र, अचानक नवरी पळून गेल्याची बातमी आल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. शनिवारी सकाळी 11 वाजता बहिणीकडे जाते, असे सांगून नवरीने घरातून धूम ठोकली. त्यानंतर, काही तासांतच मुलीचा फोनही बंद झाला. त्यामुळे तिच्या बहिणीकडे चौकशी केली असता, बहिणीकडे ती आलीच नसल्याचे सांगण्यात आले. या प्रकारामुळे नवरी मुलीच्या कुटुंबीयांनाही धक्का बसला. याप्रकरणी मुलीच्या आईने मुलगी हरविल्याची तक्रार पोलिसात दाखल केली आहे. दरम्यान, या मुलीचे दुसरीकडे प्रेम प्रकरण सुरू होते, त्यामुळे ती आपल्या प्रियकरासोबत पळून गेल्याचीही चर्चा परिसरात होत आहे.