नवी दिल्ली : मणिपूरमध्ये राज्यांतर्गत दोन समुदायांमध्ये सुरु असलेल्या संघर्षात मोठ्या प्रमाणावर हिंसाचार उसळला होता. अद्यापही काही ठिकाणी हिंसक संघर्ष असल्याचे सांगण्यात येते. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी आजपासून दोन दिवसांच्या मणिपूर दौऱ्यावर आहेत. यावरून भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे.
दरम्यान, राहुल गांधी यांच्या विरोधात ट्विट केल्याबद्दल बुधवारी अमित मालवीय यांच्याविरुद्ध बंगळुरू येथील हाय ग्राउंड्स पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. एफआयआर दाखल केल्याच्या एका दिवसानंतर अमित मालवीय यांनी राहुल गांधींवर पुन्हा हल्लाबोल केला आहे. राहुल गांधींवर टीका करताना अमित मालवीय म्हणाले की, "राहुल गांधी हे शांततेचे मसिहा नसून केवळ राजकीय मसिहा आहेत. ते संधीसाधू आहेत, त्यांना प्रकरण उकळत ठेवायचे आहे."
याचबरोबर, भाजप नेते अमित मालवीय यांनी राहुल गांधी यांना अनेक प्रश्न विचारले. काँग्रेसचे सरकार असताना राहुल गांधी यांनी मणिपूरला का भेट दिली नाही, असा सवाल त्यांनी केला. तसेच, राहुल गांधींचा मणिपूर दौरा आपल्या स्वार्थी राजकीय अजेंडातून जन्माला आला आहे, असे अमित मालवीय म्हणाले. दरम्यान, राहुल गांधी यांच्या विरोधात ट्विट केल्याबद्दल काँग्रेस पक्षाचे नेते रमेश बाबू यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अमित मालवीय यांच्याविरुद्ध बंगळुरू येथील हाय ग्राउंड्स पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता (IPC) कलम 153ए, 120बी, 505(2), 34 अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे.
दरम्यान, काँग्रेस पक्षाचे नेते केसी वेणुगोपाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधी हे आपल्या मणिपूर दौऱ्यात इंफाळ आणि चुराचंदपूर येथील समाजाच्या काही प्रतिनिधींशी संवाद साधतील. तसेच, राहुल गांधी आपल्या भेटीदरम्यान मदत शिबिरांना भेट देतील. गेल्या दोन महिन्यांपासून हिंसक संघर्ष सुरु आहे. या समूहाला संघर्ष थांबवून शांततेच्या मार्गाने नेण्याचा प्रयत्न करायला हवा. त्यासाठी त्यांना प्रतिसादात्मक संवादाची गरज आहे. हिंसाचार ही एक मानवी शोकांतिका आहे. त्यामुळे त्यावर मात करण्यासाठी प्रेमाचीच शक्ती वापरली जाणे आवश्यक आहे. राहुल गांधी तेच करत आहेत, असे वेणुगोपाल यांनी म्हटले आहे