हरीश गुप्ता, नवी दिल्ली अमित शहा यांची रविवारी भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी अपेक्षेप्रमाणे बिनविरोध फेरनिवड झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्र्यांनी त्यांना समर्थन दिले; मात्र मार्गदर्शक मंडळातील ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांनी अनुपस्थित राहत मौन विरोध जाहीर केला आहे. ही निवड तीन वर्षांसाठी असल्याने आगामी लोकसभा निवडणुकीतही भाजपाची धुरा शहा यांच्याकडेच असेल, असे दिसते. राजनाथसिंह हे केंद्रीय मंत्रिमंडळात सहभागी झाल्यामुळे मे २०१४मध्ये शहा यांच्याकडे पक्षाध्यक्षपदाची धुरा सोपविण्यात आली होती. तीन तास चाललेल्या निवड प्रक्रियेत शहा यांना समर्थन देणारे एकूण १७ नामांकन दाखल झाले होते. उपाध्यक्ष अविनाश राय खन्ना यांनी मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले. त्यांनीच शहा यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा केली. हरियाणाचे मुख्यमंत्री अन्यत्र व्यग्र असल्यामुळे येऊ शकले नाहीत. ते वगळता सर्व भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांनी हजर राहात शहा यांच्या निवडीला समर्थन जाहीर केले. पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी उपस्थित नव्हते. संसदीय मंडळाची बैठक २८ जानेवारी रोजी होण्याची शक्यता असून त्यावेळी ते उपस्थित राहून शहा यांचे व्यक्तिश:अभिनंदन करतील, असे सूत्रांनी सांगितले. शहा यांच्या अध्यक्षपदाच्या कारकीर्दीत भाजपच्या सदस्यसंख्येने नवा उच्चांक नोंदविला असतानाच चार राज्यांमध्ये भाजपला सत्ताही मिळवता आली. अडवाणी आणि जोशी यांनी याआधीच ५१ वर्षीय शहा यांच्या नेतृत्वाबद्दल नाराजी व्यक्त केली असल्यामुळे पक्ष मुख्यालयात राष्ट्रीय आणि प्रदेशनेत्यांनी शहा यांच्या अभिनंदनासाठी रांगा लावल्या असताना या दोन ज्येष्ठ नेत्यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली. अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी केवळ शहा यांचेच नामांकन आले. राजनाथसिंग, एम. वेंकय्या नायडू, नितीन गडकरी तसेच भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या नावाला अनुमोदन दिले. शहा यांची एकमताने तीन वर्षांच्या नव्या टर्मसाठी झालेली निवड ही पक्षाध्यक्ष अविरोध निवडून आणण्याच्या परंपरेला धरूनच झाली. शहा यांना कायम ठेवण्यासाठी मोदी आणि रा.स्व. संघाने त्यांच्या पारड्यात टाकलेले वजन महत्त्वाचे ठरले. पक्षाध्यक्षपदाच्या निवडणुकीत संघाची भूमिका नेहमीच महत्त्वाची राहात आलेली आहे.यावर्षी पाच राज्यांत तसेच पुढील वर्षी उत्तर प्रदेशात होणारी महत्त्वाची विधानसभा निवडणूक पाहता शहा यांनाच पदावर कायम ठेवण्याचा सूर पक्षात व्यक्त झाला होता. शहा यांच्या खास निकटस्थांनी त्यासाठी जोर लावला होता, अशी माहिती अंतस्थ गोटातून मिळाली आहे.(लोकमत न्यूज नेटवर्क)
अमित शहा पुन्हा भाजपाचे अध्यक्ष
By admin | Published: January 25, 2016 3:09 AM