अमित शाह-अजित पवार तासभर गुफ्तगू, अनेक मुद्दे चर्चेला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2023 10:18 IST2023-11-11T10:16:26+5:302023-11-11T10:18:06+5:30
ही बैठक संपताच अजित पवार यांनी प्रफुल्ल पटेल यांचे २६, गुरुद्वारा रकाबगंज गाठले. तिथे त्यांनी ज्येष्ठ विधिज्ञांशी दीर्घ चर्चा केली.

अमित शाह-अजित पवार तासभर गुफ्तगू, अनेक मुद्दे चर्चेला
नवी दिल्ली : डेंग्यूमुळे दोन आठवडे विश्रांती घेत असलेले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तब्येत सुधारताच शुक्रवारी दिल्ली गाठत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत तासभर चर्चा केली. तत्पूर्वी प्रतापराव पवार यांच्या निवासस्थानी त्यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची भेट घेतल्यामुळे उत्सुकता निर्माण झाली.
शुक्रवारी सायंकाळी अजित पवार, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे अमित शाह यांच्या ८, कृष्ण मेनन मार्ग येथील निवासस्थानी पोहोचले आणि त्यांच्यासोबत तासभर गुफ्तगू केले. ही बैठक संपताच अजित पवार यांनी प्रफुल्ल पटेल यांचे २६, गुरुद्वारा रकाबगंज गाठले. तिथे त्यांनी ज्येष्ठ विधिज्ञांशी दीर्घ चर्चा केली.
त्या फाइल्समध्ये दडलंय तरी काय?
अमित शाह यांच्यासोबत अजित पवार, तटकरे आणि पटेल यांच्यात बैठक सुरू असताना टेबलवरील अनेक फाइल्सही लक्ष वेधून घेणाऱ्या ठरल्या. या फाइल्समध्ये नेमके काय दडले आहे याचीही त्या निमित्ताने चर्चा सुरू होती.
मराठा आरक्षण ते विधान परिषदेवरील नियुक्त्या... अनेक मुद्दे चर्चेला
मराठा आरक्षणाचा तिढा
ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला टिकणारे आरक्षण मिळाले पाहिजे, अशी अजित पवार यांच्या गटाची भूमिका त्यांनी स्पष्ट केल्याचे समजते.
लोकसभेचे मिशन-४५
ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप आणि अजित पवार गटाला मिळालेल्या यशाच्या पार्श्वभूमीवर लोकसभेच्या ‘मिशन-४५’ विषयीच्या रणनीतीवरही या बैठकीत चर्चा झाली.
आयोगापुढील सुनावणी
निवडणूक आयोगामध्ये खरी राष्ट्रवादी कोणाची यावर २० नोव्हेंबरपासून दैनंदिन युक्तिवाद होणार आहे. याविषयीही बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे.
हेही मुद्दे चर्चेला
सहकार क्षेत्रातील आव्हाने, मंत्रिमंडळाचा विस्तारात राष्ट्रवादीचा वाटा, विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्यांची संख्या यावरही चर्चा झाल्याचे समजते.