नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा(Amit Shah) आणि भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा(JP Nada) बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यासाठी संसद भवनात पोहोचले. यावेळी त्यांच्यात अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. बैठकीत गुरुवारी भाजपच्या स्थापना दिनाच्या तयारीवरही चर्चा झाली. यासोबतच 8 एप्रिल रोजी पंतप्रधान मोदींच्या तेलंगणा दौऱ्याबाबतही चर्चा झाल्याचे सांगण्यात येते.
लोकसभेचे कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. बुधवारी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांच्या सदस्यांनी पुढील रणनीतीवर चर्चा केली. काँग्रेस नेते राहुल गांधी यांना लोकसभेतून अपात्र ठरवण्यावर आणि अदानी समूहाशी संबंधित प्रकरणाची चौकशी करण्यासाठी संयुक्त संसदीय समिती (जेपीसी) स्थापन करण्यावर विरोधी सदस्यांनी चर्चा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
संसद भवनातील सभागृहात झालेल्या बैठकीला राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्याव्यतिरिक्त काँग्रेस नेते, द्रमुक, शिवसेना (उबाठा), तृणमूल काँग्रेस आणि इतर अनेक पक्षांचे नेते उपस्थित होते. यावेळी केंद्रातील भाजप सरकारविरोधात विरोधी पक्षांच्या एकजुटीवर चर्चा झाल्याचे सांगण्यात येते.