तेलंगणामध्ये विधानसभेच्या ११९ जागांसाठी ३० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. या निवडणुकीत बीआरएस, काँग्रेस आणि भाजप अशी तिरंगी लढत होणार असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने प्रचार जोरदार सुरु केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये जोश आणि उत्साह पाहायला मिळत आहे.
अमित शाह यांनी तेलंगणातील सूर्यापेट येथे एका सभेला संबोधित करताना मोठी घोषणा केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपची सत्ता आल्यास राज्यातील मुख्यमंत्री मागासवर्गीय होईल, असे अमित शाह म्हणाले. सूर्यापेट येथे झालेल्या जनजागृती सभेत अमित शाह म्हणाले की, बीआरएस आणि काँग्रेस एकच आहेत. बीआरएस आणि काँग्रेस तेलंगणाचे काहीही भले करू शकत नाहीत, जर तेलंगणाचा संपूर्ण विकास फक्त भाजपच्या सरकारमध्येच होऊ शकेल, असेही अमित शाह यावेळी म्हणाले.
बीआरएसचे प्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री केसीआर यांनी दिलेल्या आश्वासनांवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी प्रश्न उपस्थित केला. सत्तेत आल्यास मागासवर्गीयांना तीन एकर जमीन देण्याच्या आश्वासनाचे काय झाले, असा सवाल अमित शाह यांनी केसीआर यांना केला आहे. तसेच, सत्तेत आल्यास मागासवर्गीय मुख्यमंत्री केला जाईल, या विधानाचे काय झाले? असा सवाल सुद्धा अमित शाह यांनी केला.
याचबरोबर, बीआरएस आणि काँग्रेसला तेलंगणातील लोकांचे कल्याण नको आहे, असा आरोप अमित शाह यांनी केला. हे असे पक्ष आहेत जे केवळ त्यांच्या कुटुंबीयांच्या कल्याणासाठी स्थापन झाले आहेत. या दोन्ही पक्षांना गरिबांची पर्वा नाही. केसीआर यांच्या नेतृत्वाखालील बीआरएस आणि सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसचे तेलंगणात भाजपच्या विरोधात काम करणे तेलंगणातील लोकांसाठी चांगले नाही. केटीआर यांना मुख्यमंत्री बनवण्याचा केसीआर यांचा विचार आहे आणि सोनिया गांधींना राहुल गांधी यांना पंतप्रधान बनवायचे आहे, असे अमित शाह म्हणाले.
भाजप नेत्यांशी निवडणूक संदर्भात चर्चासूर्यापेट प्रजागर्जना सभेला जाण्यापूर्वी केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी बेगमपेट विमानतळावर तेलंगणातील स्थानिक भाजप नेत्यांची भेट घेतली. तसेच निवडणुकीबाबत मार्गदर्शन केले. दरम्यान, बीआरएसचा राजीनामा देणारे माजी आमदार केएस रत्नम यांनी गुरुवारी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तेलंगणा भाजपचे राज्य शाखेचे अध्यक्ष किशन रेड्डी यांनी केएस रत्नम यांचे पक्षात स्वागत केले आहे.