नवी दिल्ली - केंद्र सरकारच्या सैन्य भरतीच्या अग्निपथ योजनेला देशातील अनेक राज्यांतून तीव्र विरोध होत आहे. बिहारमध्ये या नव्या योजनेबाबत रस्त्यावर उतरून संघर्ष सुरू आहे. अग्निपथबाबत बिहारमधील तरुणांचा संताप थांबताना दिसत नाही. बिहारमध्ये सलग तिसऱ्या दिवशी निदर्शने सुरू आहेत. आंदोलक तरुण रस्त्यावर उतरले आहेत. त्यातच, आता केंद्रीय गृहमंत्रालयाने या योजनेसंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, असम रायफल्स आणि सीएपीएफ तुकड्यांमध्ये भरती होणाऱ्यांना प्राधान्य देण्यात येईल. तर, भरतीसाठीच्या वयोमर्यादेतही 2 वर्षे वाढ करण्यात आली आहे.
अग्निपथ योजनेविरुद्ध आज शनिवारी पहाटे जेहानाबादमध्ये तरुण रस्त्यावर आले आणि त्यांनी जाळपोळ सुरू केली. देशभरातील अनेक भागांतून या योजनेला विरोध होत असताना केंद्रीय गृहमंत्रालयाने आणखी एक निर्णय जाहीर केला आहे. या योजनेंतर्गत 4 वर्षे सेवा बजावणाऱ्या जवानांना भरती प्रक्रियेत प्राथमिकता देण्यात येणार आहे. तर, असम रायफल्स आणि सीएपीएफ तुकड्यांमध्ये भरती होणाऱ्यांना भरती प्रक्रियेत 10 टक्के आरक्षण देण्यात येईल. तर, कोविडमुळे लांबलेल्या 2 वर्षांच्या भरतीप्रक्रियेमुळे या योजनेतील उमेदवारांना भरतीसाठीची वयोमर्याद वाढविण्यात आली आहे.
गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी सकाळी ट्विट करुन अग्निपथ योजनेचं स्वागत केलं आहे. यासंदर्भात आज गृह मंत्रालयाने निर्णय घेतला आहे की, अग्निपथ योजनेंतर्गत 4 वर्षे सेवा पूर्ण करणाऱ्या असम रायफल्स आणि सीएपीएफच्या जवानांना 10 टक्के आरक्षणासह प्राधान्य देण्यात येत आहे. या निर्णयानुसार योजनेवर सविस्तर काम करण्यास सुरुवात झाल्याचंही शहा यांनी सांगितलं.
जेहानाबाद जिल्ह्यातील तेहता येथे आंदोलकांनी ट्रक आणि बस पेटवून दिली. ही घटना तेहटा आऊट पोस्टजवळची आहे. तसेच, आंदोलकांनी दगडफेकही केली. रस्त्यावर दगड पसरलेले दिसून येत आहेत. घटनेची माहिती मिळताच मोठा पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला आहे. आंदोलकांनी जाळपोळ आणि दगडफेक केल्याची माहिती मिळताच जेहानाबादचे जिल्हा दंडाधिकारी आणि पोलीस अधीक्षकही घटनास्थळी पोहोचले. आंदोलकांची समजूत घालून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिस दलाकडून प्रयत्न सुरू आहेत.
बिहारमध्ये इंटरनेट सेवा बंद
बिहारमधील अनेक जिल्हे अग्निपथच्या आगीत जळत आहेत. आंदोलकांनी तीन दिवसांत अनेक गाड्या जाळल्या आणि अनेक गाड्याही जाळल्या. बिहारची परिस्थिती पाहता बिहार सरकारने राज्यातील १५ जिल्ह्यांतील इंटरनेट सेवा बंद केली आहे. इंटरनेट सेवा बंद करण्याचा हा आदेश उद्यापर्यंत म्हणजेच १९ जूनपर्यंत लागू असेल.
१३ राज्यांत विरोध
केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेविरोधातील हे लोण आता १३ राज्यांत पसरले आहे. बिहारसह उत्तर प्रदेश, तेलंगणा, दिल्ली, राजस्थान, हरयाणा, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, पश्चिम बंगाल, उत्तराखंड, मध्य प्रदेश, ओडिशा या राज्यात आंदोलकांनी उग्र निदर्शने केली. यात बिहार व तेलंगणध्ये प्रत्येकी एक मिळून दोघांचा मृत्यू झाला.