Amit Shah Bihar Rally: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी बिहारच्या लखीसरायमध्ये जाहीर सभेला संबोधित करताना मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर सडकून टीका केली. नितीश कुमारांचे 'पलटू बाबू' असे वर्णन करत शहा म्हणाले की, नितीश कुमार पंतप्रधान मोदींमुळेच बिहारचे मुख्यमंत्री झाले आहेत. यासोबतच शहांनी केंद्र सरकारचे कौतुकही केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 9 वर्षातील कामांची माहिती दिली.
शहा म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी भारताला अभिमानाची 9 वर्षे दिली आहेत. ते 9 वर्षांपासून देशातील गरिबांसाठी काम करत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली लोककल्याणकारी योजनांचा लाभ देशातील प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचत आहे. पंतप्रधान मोदींच्या परदेश दौऱ्यावर म्हणाले की, त्यांना इतर देशांतून मिळत असलेला आदर हा भाजप किंवा पीएम मोदींचा आदर नसून संपूर्ण देशाचा आदर आहे.
ते पुढे म्हणाले की, पलटू बाबू नितीश कुमार म्हणतात की, मोदींनी 9 वर्षात काय केले? अहो नितीश कुमार, ज्यांच्यामुळे तुम्ही मुख्यमंत्री झालात, किमान त्यांचा तरी विचार करा. मोदींची 9 वर्षे गरीबांसाठी आणि भारताच्या सुरक्षेसाठी होती. मी हिशोब देण्यासाठी आलो आहे. नळांद्वारे गरिबांच्या घरापर्यंत पाणी पोहोचले. गरिबांच्या घरापर्यंत सर्व सुविधा देण्याचे काम मोदी सरकारने केले. पंतप्रधान मोदी परदेश दौऱ्यावर गेले तरी मोदी-मोदीचा नारा घुमतो.
पंतप्रधान मोदींनी ते केले आहे, ज्याचा कोणी विचारही केला नव्हता. सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईकद्वारे पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद संपवण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मीरमधील कलम 370 हटवले. 9 वर्षात देशाला सर्व बाजूंनी सुरक्षित ठेवण्याचे कामही मोदींनी केले, असंही शहा म्हणाले.